spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोडेलोहारा शाळेला कुणी शिक्षक देता का शिक्षक ?

– ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांकडून होतेय मागणी; 137 विद्यार्थ्यांचा भार 3 शिक्षकांवर 

तिरोडा :- विद्यार्थी संख्या 137 आहे, मात्र त्यांना शिकवायला शिक्षकच मिळत नाही, अशी स्थिती तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा शाळेची झाली आहे. या शाळेतून 3 शिक्षकांची बदली झाल्याने या आदर्श शाळेत शिकवायला कोणी शिक्षक देता का शिक्षक? अशी आर्त मागणी येथील विद्यार्थी व ग्रामस्थांमधून होत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या नसल्याने शिक्षक अतिरिक्त होत आहेत. मात्र कोडेलोहारा गावात विद्यार्थी संख्या असूनही शिकवायला शिक्षक मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पुरेसे शिक्षक मिळावेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव करून तसे मागणी पत्र शिक्षण विभागाला दिले आहे. येथील जि. प. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 137 विद्यार्थी शिकत आहेत. मात्र सद्यस्थितीत 1 मुख्याध्यापक व 2 शिक्षण सेवक येथे कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमधून 3 शिक्षक येथून बदली करून गेले. त्यामुळे शाळेचा भार तीन शिक्षकांना पेलावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून ही शाळा आदर्श शाळा बनली आहे, मात्र सध्या या आदर्श शाळेला शिक्षक मिळत नसल्याने शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत.

संचमान्यतेनुसार या शाळेत अजून 3 प्राथमिक सहायक शिक्षक व 1 भाषा विषयाचा पदवीधर शिक्षक आवश्यक आहे. असे असताना शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाहीत. शिक्षण विभागाला पत्र देऊनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे पालक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका, आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्या, अशा मागणीचा ग्रामपंचायत ठराव येथील ग्रामस्थांनी केला आहे.

शिक्षक उपलब्ध करून द्या, अशा आशयाचे पत्र सरपंच रवींद्र भगत, उपसरपंच सेवक बघेले, ग्रामपंचायत सदस्य सीलार्थ खोब्रागडे, सुशील बोपचे, पौर्णिमा टेंभेकर, अनिता रहांगडाले, रेखा पारधी, अनुसया उईके, मीनाक्षी वालदे यांनी पंचायत समितीला दिले आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. येथील अधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.