नागपूर :- नंदनवन, नागपूर येथील श्रीमती जानकीदेवी जैस्वाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी ‘सायबर हायजीन आणि सायबर एथिक्स’ या विषयावर सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात २४६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा कार्यक्रम एडुसन फाउंडेशन यांच्या वतीने आणि सायबर सेल, नागपूर पोलीस यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. सायबर सेल, नागपूर पोलीसचे तन्मय रायसने हे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रायसने यांनी सायबर हायजीन, तंत्रज्ञानाचा नैतिक वापर तसेच सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांबाबत माहिती दिली. गेमिंग ॲप्स, टास्कच्या नावाखाली होणारी फसवणूक, संशयास्पद APK फाइल्स तसेच सध्या चर्चेत असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ या फसवणुकीच्या प्रकाराबाबत त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागरूक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. निलेश काळे यांनी सोशल मीडियाच्या अतिवापराचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी शिक्षण व कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करावे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच चांगले चारित्र्य, सायबर बुलिंग आणि सोशल मीडियावरील जबाबदार वर्तनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तांदळे गुरुजी रिसोर्स अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष दिलीप एम. तांदळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यासंदर्भात त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका संध्या जैस्वाल, उपमुख्याध्यापक विनोद काळे, विजय, एडुसन फाऊंडेशनचे संचालक व कार्यक्रम समन्वयक निलेश काळे आणि दिलीप एम. तांडले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे वरिष्ठ शिक्षक व कार्यक्रम समन्वयक उमेश ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तसेच विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध उपस्थिती व व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. विनोद काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी सायबर हायजीन आणि सायबर एथिक्सचे पालन करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित, जबाबदार आणि योग्य वापर करण्याचा संकल्प केला.





