spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केंद्रीय ओबीसी यादीतील प्रलंबित २७ जातींचा तत्काळ समावेश करा

– महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना निवेदन

नागपूर :- महाराष्ट्रातील केंद्रीय ओबीसी यादीत प्रलंबित असलेल्या २७ जातींचा तत्काळ समावेश करावा, तसेच मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अमित खांडे यांच्यामार्फत सादर करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने पूर्व विदर्भ- नागपूर विभागात ७ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मंडल आयोग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मंडल आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष बी. पी. मंडल यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मंडल यात्रा’ काढण्यात आली. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संविधान चौक येथून या यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करीत ११ ऑगस्ट रोजी सेवाग्राम येथील चरखा सभागृहात यात्रेचा उत्साहात समारोप झाला. या मंडल यात्रेदरम्यान गावपातळीपासून तालुका व जिल्हास्तरापर्यंत ओबीसी कार्यकर्त्यांचे मेळावे, संवाद सभा आणि चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले. या चर्चांमधून ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या केंद्र व राज्य सरकारकडे अद्याप प्रलंबित असल्याचे समोर आले. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी केंद्र व राज्य सरकार विरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

केंद्र सरकारकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये मंडल आयोगाची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, २०२७ मध्ये होणाऱ्या जातिनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवावा, महाराष्ट्रातील केंद्रीय ओबीसी यादीत प्रलंबित २७ जातींचा तत्काळ समावेश करावा, राष्ट्रीय ओबीसी आयोगाची दोन विभागीय कार्यालये स्थापन करावीत आणि केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करावे, या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांचे निवेदन मोरेश्वर भादे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात अजय हटेवार, राष्ट्रीय समन्वयक ओबीसी काँग्रेस; भूषण तल्हार, संजय भिलकर व सचिन वैद्य, उपाध्यक्ष; चंद्रकांत हिंगे, महासचिव; संध्या बिसेन व प्रमोद शिंगणे, सचिव; प्रशांत पवार, नागपूर शहर अध्यक्ष; संतोष गोटाफोडे, शहर महासचिव; अरविंद क्षीरसागर, दक्षिण नागपूर अध्यक्ष; अशोक निखाडे, महादेव दयने, तेजस तायडे आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.