spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘कहानी वंदे मातरम् की’ नृत्य नाटिकेतून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास उलगडणार

नागपूर :- ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर राधिका क्रिएशन्स प्रस्तुत व ताराराणी फाउंडेशन निर्मित ‘कहानी वंदे मातरम् की’ ही दीड तासांची भव्य नृत्य नाटिका स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने १५ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येणार आहे. कविवर्य सुरेशभट सभागृह, रेशीमबाग येथे सायंकाळी ७ वाजता नागपूर महानगरपालिकेच्या सौजन्याने हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘कहानी वंदे मातरम् की’ या नृत्य नाटिकेत नृत्य, नाट्य आणि स्क्रीन या तिन्ही माध्यमांचा प्रभावी संगम करण्यात आला आहे. ‘वंदे मातरम्’ या गीताची निर्मिती, त्याचा स्वातंत्र्यलढ्यातील प्रवास आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची गाथा या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. आजच्या तरुण पिढीला ‘वंदे मातरम्’ म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आहे आणि स्वातंत्र्यलढ्यात या गीताने निर्माण केलेली राष्ट्रभावना किती प्रभावी होती, याची माहिती मनोरंजक व प्रभावी पद्धतीने या नाटिकेतून दिली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान यांचे दर्शन नृत्य, अभिनय व दृक्- श्राव्य माध्यमातून घडविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन श्रीधर गाडगे, दिग्दर्शन संजय पेंडसे यांचे असून रवींद्र भुसारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नाटिकेत सारिका पेंडसे, प्रवीण पारधी, रवींद्र भुसारी, शशांक गाडगे, अभिनव नखाते, शैलेश भलमे, मेघश्याम बडकेस, हेमंत जिचकार, रसिका रिसालदार, मुकुल ब्रह्मापुरकर, विकास वडदेवार, छकुली जाधव यांच्यासह अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. नृत्यकलावंत देहली तेलंग, सानिका मुंडले, अपूर्वा दसरे, रश्मी श्रीवास, यशश्री मोरे आदी कलाकार नृत्य सादर करणार आहेत. नृत्यदिग्दर्शक अंतरा देशपांडे, वैदेही तेलंग, नेपथ्य हेमंत जिचकार, संगीत प्रशांत फासे, प्राची सखदेव, ध्वनी संयोजन सुनील ऑडिओ एँड, व्हिडिओ ग्राफी शैलेश भलमे व विलास चाफके यांचे सहकार्य लाभले आहे. निर्मिती सहाय्य नीलिमा बावणे, मिनल मुंडले, ज्ञानबंधू शुक्ला, डॉ. सर्वेश कुमार वर्मा, बालकृष्ण भरतीया यांचे असून विशेष सहाय्य व मार्गदर्शन डॉ. पंकज चांदे, प्रकाश पाठक धुळे, ॲड. रमण सेनाड, अनुजा परचुरे यांचे लाभले आहे. या नाटिकेचे शुभारंभाचे प्रयोग १५ ऑगस्ट रोजी नागपूर, १७ ऑगस्ट रोजी पुणे, २० व २४ ऑगस्ट रोजी भंडारा, २५ ऑगस्ट रोजी अमरावती आणि अकोला येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली. नागपूरमधील १५ ऑगस्टचा प्रयोग व त्यानंतरचे सर्व शुभारंभाचे प्रयोग रसिकांसाठी निःशुल्क ठेवण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नव्या पिढीला राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्यलढा आणि ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक महत्त्वाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संजय पेंडसे यांनी सांगितले. नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नृत्य नाटिकेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याप्रसंगी पत्रकार परिषदेला संजय पेंडसे, मिनल मुंडले, ज्ञानबंधु शुक्ला आणि ॲड. रमण सेनाड यांची उपस्थिती होती.

Popular Articles