spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्षुल्लक कारणावरून वडिलांचा खून; मुलासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

– मुलासह पत्नीविरुद्ध पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल

पांढरकवडा :- घरातील किराणा सामान का आणले नाही, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान वडिलांच्या हत्येत झाले. मुलाने लाकडी दांड्याने वडिलांच्या डोक्यात प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ९) रात्री तालुक्यातील मोहदा येथे घडली. मृताचे नाव गजानन गुलाब जुमनाके (५२), रा. शितला माता देवी वॉर्ड, मोहदा असे आहे. या प्रकरणी मृताचे मोठे भाऊ रमेश जुमनाके यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी गजानन यांची पत्नी दुर्गा जुमनाके (४६) व मुलगा अक्षय जुमनाके (३२) यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गजानन घरी आल्यानंतर किराणा सामान आणण्यावरून त्यांचा पत्नी दुर्गासोबत वाद झाला. यावेळी दुर्गाने मुलगा अक्षय घरी येऊ दे, असे सांगत गजानन यांना धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर रात्री अक्षय घरी आल्यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली. घरातून भांडणाचा आवाज ऐकू आल्याने परिसरातील काही तरुण घटनास्थळी धावले. यावेळी अक्षयने हातातील लाकडी दांड्याने वडील गजानन यांच्या डोक्यात प्रहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात गजानन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर पत्नी दुर्गानेही त्यांच्यावर लाकडी दांड्याने प्रहार केल्याचा आरोप आहे. जखमी गजानन यांना वाहनातून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच गजानन यांचा मृत्यू झाला.

भावाच्या मृत्यूनंतर रमेश जुमनाके यांनी पांढरकवडा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नी व मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे करीत आहेत.

Popular Articles