spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्ह्यात ४५८ गावात वित्तीय साक्षरता शिबिरे

– नागरिकांनी रि-केवायसी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा – भारतीय रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय संचालक सचिन शेंडे यांचे आवाहन

गडचिरोली :- संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या वित्तीय समावेशन अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण 458 गावांमध्ये शिबिरे/कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. हे अभियान 01 जुलै 2025 पासून सुरू असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC), भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), सर्व बँका तसेच अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत 23 ते 24 सप्टेंबर दरम्यान वडसा, मुलचेरा आणि आरमोरी तालुक्यात शिबिरे घेण्यात आली. या सर्व शिबिरांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे नागपूरचे क्षेत्रीय संचालक सचिन शेंडे प्रमुख्याने उपस्थित होते.

वडसा तालुक्यातील शिबिर (23 सप्टेंबर)-

वडसा येथे झालेल्या वित्तीय साक्षरता कॅम्पमध्ये सचिन शेंडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना नागरिकांना Re-KYC प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. विशेषत: 10 वर्षांहून अधिक काळापूर्वी खाते उघडलेले सर्व खातेधारकांनी आपली कागदपत्रे 30 सप्टेंबर 2025 पूर्वी आपल्या संबंधित बँकेत जमा करून Re-KYC पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) व अटल पेन्शन योजना यामध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करून, 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन मिळविण्याचा अटल पेन्शन योजनेचा लाभ गडचिरोलीतील प्रत्येक 18 वर्षांवरील नागरिकांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.

मुलचेरा तालुक्यातील शिबिर (24 सप्टेंबर)-

मुलचेरा येथे झालेल्या शिबिरात सचिन शेंडे यांच्यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाप्रबंधक श्रीराम भोर, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रमोद सांबळे, तसेच अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे, बंद खात्यांची Re-KYC प्रक्रिया तसेच निष्क्रिय खात्यांतील रक्कम RBI कडे दावा करून परत मिळविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आरमोरी तालुक्यातील शिबिर (24 सप्टेंबर-)

आरमोरी तहसील कार्यालय येथे बैंक ऑफ इंडिया तर्फे आयोजित शिबिरात रिझर्व्ह बँकेचे क्षेत्रीय संचालक सचिन शेंडे, बँक ऑफ इंडियाचे नागपूर विभागाचे आंचलिक प्रबंधक जयनारायण, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाप्रबंधक श्रीराम भोर, अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे, तसेच विविध बँकांचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांना बँक खात्यांमध्ये नामनिर्देशित (Nominee) करण्याची आवश्यकता, निष्क्रिय खाते सक्रिय करण्याची प्रक्रिया आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अभियानाचा आढावा

जुलै ते सप्टेंबर 2025 या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत शिबिरे घेण्यात येत आहेत. अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात असून, सर्व बँकांना नागरिकांकडून Re-KYC कागदपत्रे वेळेत जमा करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरांद्वारे गडचिरोलीतील ग्रामीण नागरिकांना बँकिंग व्यवहार, सुरक्षा योजना, पेन्शन सुविधा आणि खातेविषयक नियमांची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.