नागपूर :- पर्यावरण रक्षणाचा वसा घेत नागपूर जिल्ह्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांनी एक आदर्श आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महावितरणच्या ‘गो ग्रीन’ या लोकप्रिय योजनेला नागपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, कागदी बिलांना पूर्णपणे फाटा देत डिजिटल बिलांचा स्वीकार केला आहे. या पर्यावरणपूरक आणि दूरगामी निर्णयामुळे जिल्ह्यातील जागरूक वीज ग्राहकांनी वर्षाला तब्बल 3 कोटी 5 लाख 92 हजार 320 रुपयांची घसघसीत बचत केली आहे.
पर्यावरण संवर्धनाला थेट आर्थिक फायद्याची जोड देणाऱ्या या योजनेअंतर्गत, ‘गो ग्रीन’चा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या पहिल्याच बिलात संपूर्ण वर्षासाठीची 120 रुपयांची सवलत (10 रुपये प्रति महिना) एकत्र देण्यात येत आहे. या अत्यंत आकर्षक आणि ग्राहककेंद्री योजनेमुळे नागपूर जिल्ह्यात डिजिटल बिलांचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या वेगाने वाढून आता विक्रमी 2 लाख 54 हजार 936 वर पोहोचली आहे.
पूर्वी या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दरमहा 10 रुपयांची सवलत मिळायची. परंतु, जानेवारी 2025 पासून महावितरणने नियमात बदल करत, गो ग्रीनचा पर्याय निवडल्याच्या पहिल्याच बिलात पुढील 12 महिन्यांसाठीची संपूर्ण 120 रुपयांची सवलत एकत्र देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. या बदलामुळे जानेवारी 2025 मध्ये 19 हजार 370 असलेले ग्राहक जानेवारी 2026 मध्ये 28 हजार 501 पर्यंत पोहोचले आणि आज ही संख्या तब्बल 2 लाख 54 हजार 936 च्या टप्प्यावर पोहोचली आहे.
‘गो ग्रीन’ योजनेमुळे ग्राहकांना अनेक मोठे फायदे मिळत आहेत. नोंदणीकृत ईमेल, मोबाईलवर एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे दरमहा अचूक वीजबिल अगदी वेळेवर उपलब्ध होते. हे बिल मोबाईल किंवा संगणकात सुरक्षित ठेवता येते, तसेच आवश्यकतेनुसार केव्हाही डाऊनलोड किंवा रंगीत प्रिंट काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, बिलाच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत ऑनलाइन भरणा केल्यास ग्राहकांना अतिरिक्त एक टक्क्यांची सवलत देखील मिळत आहे.
या पर्यावरणपूरक प्रवासात सहभागी होणे अतिशय सोपे असून, ग्राहकांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर जाऊन आपला ग्राहक क्रमांक सबमिट करायचा आहे. याद्वारे छापील बिलाची प्रत रद्द होऊन नोंदणीकृत मोबाईल व ईमेलवर दरमहा डिजिटल बिल पाठविण्यात येते.
निसर्गाचे जतन आणि घसघसीत आर्थिक बचत साधणाऱ्या या सुवर्णसंधीचा लाभ नागपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी घ्यावा, कागदी बिलांचा मोह टाळून ‘गो ग्रीन’चा पर्याय स्वीकारावा आणि पर्यावरण रक्षणात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.





