– ६० स्पर्धकांनी दाखविले कलाकौशल्य
– विजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात आले
नागपूर :- तेजश्री उपाध्याय यांच्या आयोजनात भव्य मेहंदी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ६० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सर्जनशीलतेचे, कलाकौशल्याचे आणि आकर्षक मेहंदी डिझाइन्सचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण परीक्षक मीना गुप्ता आणि प्रणिता राऊत यांनी केले. मेहंदीची सुंदरता, स्वच्छता, बारीकसारीक कलाकुसर, सर्जनशीलता, डिझाइन आणि एकूण सादरीकरण या विविध निकषांच्या आधारे सर्व स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. अटीतटीच्या स्पर्धेनंतर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. महेक वर्मा हिने विजेतेपद पटकावले. इकरा फातिमा हिने प्रथम उपविजेतेपद, तर इफरा तनझीम हिने द्वितीय उपविजेतेपद मिळविले. विजेत्या महेक वर्माला ₹५,०००, प्रथम उपविजेत्या इकरा फातिमाला ₹२,००० आणि द्वितीय उपविजेत्या इफरा तनज़ीमला ₹१,००० चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आयोजक तेजश्री उपाध्याय यांनी सर्व ६० स्पर्धक, परीक्षक तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे प्रतिभावान मेहंदी कलाकारांना आपले कलाकौशल्य सादर करण्याची, ओळख निर्माण करण्याची आणि पुढे जाण्याची उत्तम संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात ही स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. सर्व ६० स्पर्धकांच्या सर्जनशीलतेचे आणि मेहनतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.





