नागपूर :- ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त देवेन्द्र फडणवीस यांच्या भाजपा दक्षिण पश्चिम मतदार संघातील जनसंपर्क कार्यालयात दिव्यांगांसाठी शासकीय योजनाचे मार्गदर्शन व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे करण्यात आले होते. यातील 320 दिव्यांग नागरिकांनी लाभ घेतला. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजू राऊत यांनी तर प्रास्ताविक भाजपा दिव्याग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे अमोल वाळके यांनी केले. तसेच दिव्यांगांच्या शासकीय योजनांचे मार्गदर्शन सुद्धा केले. तसेच भाजपा वैद्यकीय आघाडी तर्फे डॉ. विनोद दाढे आणि कॅम्प कॉर्डिनेटर माधुरी इंदूरकर यांनी आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केले.

या शिबिरात निःशुल्क औषधोपचार, 67 प्रकारच्या ब्लड टेस्ट तसेच ईसीजीपासून ते मेमोग्राफी पर्यंत अशा अनेक चाचण्या करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुनील मित्रा, भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, गिरीश देशमुख, सुधाकर कोहळे, त्रिमूर्ती नगर मंडळ अध्यक्ष ईश्वर ढेंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी अमोल वाळके आणि डॉ. राजू राऊत यांनी सर्व आयोजक स्वयंसेवक व सहभागी बांधवांचे आभार मानले.




