यवतमाळ :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन रणनीतीचा प्रसार या प्रकल्पाअंतर्गत मौजे आष्टी, तालुका कळंब येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला), केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, आणि कृषी विभाग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या मेळाव्यास संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डॉ. दीपक कच्छवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, डॉ. शिवाजी थुबे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, सचिन कुबडे, सरपंच, आष्टी डॉ. प्रमोद नागोराव मगर, शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), कृषी विज्ञान केंद्र, सुरेशराव कुबडे, प्रगतिशील शेतकरी, आष्टी व प्रवीण चंदनशिवे, सहाय्यक कृषी अधिकारी, आष्टी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद मगर यांनी केले. तांत्रिक सत्रात डॉ. शिवाजी थुबे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मिलन व्यत्यय तंत्रज्ञान यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सुरेश नेमाडे, निवृत्त सहयोगी प्राध्यापक, पीडीकेव्ही अकोला यांनी कापूस पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
डॉ. दीपक कच्छवे यांनी सघन कापूस लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले. डॉ. प्रमोद मगर यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र घेण्यात आले, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.



