spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा येथे नाकाबंदीत १२.९८ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

– चोटीवाला आट्याच्या पोत्यांच्या आडून मध्यप्रदेशातून नागपूरकडे प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक

खापा, वार्ताहर :- मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर खापा पोलिसांनी मोठी कारवाई केली. कोंबिंग नाकाबंदी दरम्यान जवाहर टी पॉईंट येथे संशयास्पद मालवाहू वाहनाची तपासणी केली असता, चोटीवाला आट्याच्या पोत्यांच्या आड लपवून नेण्यात येत असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह एकूण १२ लाख ९८ हजार २४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली.

बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास जवाहर टी पॉईंट, खापा येथे कोंबिंग नाकाबंदी सुरू होती. मध्यप्रदेशकडून बडेगावमार्गे खापा व पुढे नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना एमपी-२२-जी-३००६ क्रमांकाचे टाटा मालवाहू वाहन पोलिसांना संशयास्पद आढळले. वाहनाची झडती घेतली असता चोटीवाला आट्याच्या पोत्यांच्या आड महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू, पानमसाला व गुटखा लपवून नेला जात असल्याचे उघड झाले.

या कारवाईत २ लाख ८८ हजार २४ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा, १० हजार रुपयांचा मोबाईल आणि अंदाजे १० लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा एकूण १२ लाख ९८ हजार २४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन विभाग, नागपूरचे अधिकारी राजेश यादव यांच्या तपासणी अहवाल व फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक शहीद मन्सुरी रफिक मन्सुरी (वय ३४) व क्लीनर राजा जंगलसी धुर्वे (वय २८), दोघेही रा. बांका नागणपूर, ता. चांदचौराई, जि. छिंदवाडा (मध्यप्रदेश), यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या नेतृत्वात पीएसआय एकनाथ राठोड, हेड कॉन्स्टेबल पंकज ठाकूर, हेड कॉन्स्टेबल यादगीरे, पोलीस शिपाई अक्षय, पोलीस शिपाई रणधीर गेडाम व होमगार्ड गुप्ता यांच्या पथकाने केली.

“अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ”

खापा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या अशा प्रकारच्या वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असून, नाकाबंदीच्या माध्यमातून अवैध वाहतुकीला आळा घालण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.