खापा :- शहरातील सैय्यद हजरत बाबा सैय्यद लष्कर शाहा शहीद रहमतुल्ला अलैह दरगाहच्या प्रांगणात हजरत हाजी बाबा रहमतुल्लाह अलैह यांच्या ऊर्सचे आयोजन करण्यात आले होते.
दि. ४ डिसेंबर रोज गुरुवारला सकाळी बाबांच्या समाधीचे तीर्थ (घुस्ल) झाले. त्यानंतर ध्वजारोहण करून उर्सला प्रारंभ झाला. सायंकाळी पाच वाजता बैंक ऑफ बडोदा बाजार चौक जवळील मदार शाहा बाबांच्या निंबाच्या झाडा जवळून संदल निघाला. लक्ष्मीकृपा धुमाल पार्टी नागपुरच्या ढोल ताशाच्या गजरा आणि नौशाही सेहरा मेल पार्टी कामठीच्या कवालीच्या सुगम स्वरात गावाची गस्त करत संदल हाजी बाबांच्या दरगाह येथे पोहोचला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबांच्या मजारवर चादर चढविण्यात आली आणि देशासाठी शांतता व सुव्यवस्था, प्रेम भवणेसाठी दुआ करण्यात आली. त्यानंतर लंगरचे आयोजन करण्यात आले होते. लंगरचा शेकडो भाविकांनी आस्वाद घेतला. शुक्रवार दि. ५ डिसेंबरला सकाळी कुल शरीफ व फातेहा होऊन बाबांच्या उर्सचे समापन झाले. अनेक भाविकांनी बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.
यावेळी प्रमुख पाहुने म्हणून आमदार आशिष देशमुख, रविंद्र कवडे, छगन कवडे, पियुष बुरडे, खेमराज बारापात्रे, सतीश लांजेवार, अमित राय, ईशान बांगडे, किशोर आष्टनकर, महेबूब शेख, यासिन पठाण, हसन पठाण, जब्बार शेख, मकसुद शेख, सादीक बाघाडे, प्यारू शेख, मनोज निमजे, गोपाल कोल्हे व शेकडो भक्तगण उपस्थित होते. उर्स यशस्वीतेसाठी उर्स दर्गा कमिटीचे अध्यक्ष इमरान सैय्यद, उपाध्यक्ष युनूस कुरेशी, सदस्य सईद कुरेशी, मस्तान कुरेशी, युनूस अली, आसिफ शेख, तोशिफ कुरेशी, आफताब कुरेशी, व खापा शहरवासीयांनी अथक प्रयत्न केले.








