Home Latest News चतकोरावरच सुख ?

चतकोरावरच सुख ?

0

<p><strong>आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आली असतानाही भारत सरकारचे रोखे विकण्याकडे परदेशी गुंतवणूकदारांचा कल वाढणे हे गंभीरच…<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकावर गेल्याचे वृत्त २०२५ च्या अखेरच्या दिवशी येणे आणि आज एक जानेवारी २०२६ या नववर्षदिनी प्रसृत होणे ही अत्यानंदाची बाब&period; वर्षअखेरीस आपल्या अर्थव्यवस्थेने चार लाख १८ हजार कोटी डॉलर्सचा टप्पा गाठला&period; एकेकाळी आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्लंडला तर आपण कधीच मागे टाकले आहे&period; आज आपण जपानच्या पुढे गेलो&period; म्हणजे आता आपल्यापुढे फक्त तीन देश तेवढे राहिले&period; तिसऱ्या क्रमांकावरचा जर्मनी&comma; दुसऱ्यावरून पहिल्यावर जाऊ पाहणारा चीन आणि कित्येक दशकांपासून पहिल्या क्रमांकावर प्रतिष्ठापित एकमेवाद्वितीय अमेरिका&period; या तीन देशांस एकदा का मागे सारले की झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>आपण झालोच महासत्ता&period; वास्तविक यातील जर्मनी तर आपल्या महाराष्ट्राइतकाही नाही&period; लोकसंख्या आणि आकार या दोन्ही आघाड्यांवर खरे तर एकट्या महाराष्ट्राने त्यास मागे टाकायला हवे&period; आणि उत्तर प्रदेशची तुलना तर समग्र युरोपशीच व्हायला हवी&period; विकसित भारताचे स्वप्न साकारण्याच्या मार्गावर असताना तेही होईल&period; त्यामुळे आपण जर्मनीची चिंता करण्याचे कारण नाही&period; म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आपण विराजमान होणे फार दूर नसेल&period; आपण चार लाख कोटी डॉलर्सचा टप्पा ओलांडत असताना तिसऱ्या क्रमांकावरचा जर्मनी आपल्यापेक्षा फक्त लाख-सव्वा लाख कोटी डॉलरने काय तो पुढे आहे&period; ही दरी आपण सहज ओलांडू&period; त्यानंतरच्या चीनची १९ लाख कोटी डॉलर्सची तर अमेरिकेची ३१ लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या क्रमांकांच्या आनंदास बाधा आणू शकणारा कुजकट तपशील असा की ज्या जपानला आपण मागे टाकले त्या देशात तेथील नागरिकांचे सरासरी दरडोई उत्पन्न साधारण ४० हजार डॉलर्स इतके आहे&comma; ज्या जर्मनीस आपण मागे टाकू पाहतो त्या देशातील नागरिक वर्षाला ६० हजार डॉलर्स कमावतात&comma; सर्वसाधारण चिनी वर्षाला १४ हजार डॉलर्स कमावतो&comma; अमेरिकी नागरिकाचे वर्षाचे उत्पन्न असते ८९ हजार डॉलर्स इतके आणि या स्पर्धेत आघाडी घेणाऱ्या भारतातील नागरिकांची वर्षाची सरासरी कमाई आहे २७०० डॉलर्स&period;<&sol;p>&NewLine;<p>शालेय वर्गात जेव्हा आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेचा विद्यार्थी जेव्हा पहिला क्रमांक पटकावतो तेव्हाही दुसऱ्या क्रमांकावर कोणी ना कोणी असतेच&period; तथापि आईन्स्टाईन पहिला आणि मी दुसरा असे त्याने मिरवावे किंवा काय&comma; इतकाच काय तो प्रश्न&period; नववर्षाच्या आनंदावर या प्रश्नाच्या उत्तराने पाणी ओतले जाणार असल्याने तो टाळून अन्य दोन महत्त्वाच्या घटनांची दखल यानिमित्ताने घ्यायला हवी&period; भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत झालेली लक्षणीय कपात आणि परदेशातील गुंतवणूकदारांकडून भारत सरकारचे रोखे विकून टाकण्याचा सुरू असलेला झपाटा या त्या दोन घटना&period; वास्तविक देश आर्थिक प्रगतीबाबत चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारत असताना या दोन बातम्याही आल्या नसत्या तर नववर्ष दिनाच्या बासुंदीत मिठाचा खडा पडता ना&period; पण सगळ्याच संख्या-तपशिलांवर नाही नियंत्रण ठेवता येत&period; अशा संख्यानोंदी करणाऱ्या सगळ्या यंत्रणा काही निवडणूक आयोग नसतात वा जनगणनेप्रमाणे त्यांना दूर ठेवताही येत नाही&period; या वास्तवामुळे एकाच वेळी भारताच्या आर्थिक प्रगतीची झेपावणारी बातमी आणि त्याच वेळी हे विरस करणारे सत्य समोर आले&period; त्यामुळे त्याचीही दखल घ्यावी लागणार&period; त्यास इलाज नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>पहिला मुद्दा आहे तो भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या गळतीबाबत&period; गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांत साधारण १२ टक्क्यांनी घट झाली&period; त्यातही विशेषत&colon; आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत परदेशी पर्यटकांचे पाठ फिरवणे अधिक क्लेशदायी&period; पहिल्या तिमाहीत २६ लाख परदेशी पर्यटकांनी भारत दर्शन केले&period; दुसऱ्या तिमाहीत ही संख्या १६ लाख इतकी गडगडली&period; तिसऱ्यात वाढ झाली नाही म्हणायला&period; पण किंचितशीच&period;<&sol;p>&NewLine;<p>या तिमाहीत १९ लाख परदेशी पर्यटकांनी भारतात पायधूळ झाडली&period; परंतु तरीही ही संख्या आपली निराशा करणारीच ठरते&period; आपण याबाबत करोना-पूर्व काळापेक्षा मागे आहोत ही बाब खेद वाटावा अशी&period; यावर काही स्वदेशाभिमानींस परदेशी पर्यटक न आल्याने आपले काहीही अडत नाही&comma; असे वाटणारच नाही&comma; असे नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>देशी पर्यटक आपल्या पर्यटन क्षेत्रास उभारी देण्यास पुरेसे आहेत हे खरे&period; पण परदेशी पर्यटक डॉलर्समध्ये खर्च करतात आणि त्यामुळे विमान ते हॉटेल कंपन्या अशांचा फायदा होत असतो&period; तेव्हा परदेशी पर्यटक हे अर्थव्यवस्थेच्या आकार- विस्तारासाठी नितांत गरजेचे ठरतात&period; त्यांची संख्या वाढावी यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्यास म्हणावे तसे यश अद्याप तरी आलेले नाही&period; इतक्या मोठ्या आपल्या खंडप्राय देशात वर्षभरात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या जेमतेम एक कोटभर भरते&period; या पार्श्वभूमीवर दुबईसारख्या एक शहरी देशात वर्षभरात भारताच्या जवळपास दुप्पट परदेशी पर्यटक येतात हे सत्य आपल्या रस्त्यांवरील खाचखळग्यांमुळे बसतो तसा धक्का देते&period; तेव्हा अधिकाधिक पर्यटक आपण आकृष्ट कसे करून घेऊ यासाठी आपणास अधिक प्रयत्न करावे लागतील&period;<&sol;p>&NewLine;<p>दुसरा मुद्दा आहे तो भारतीय रोख्यांतील गुंतवणूक काढून घेण्याचा परदेशस्थ गुंतवणूकदारांचा वाढता कल&period; बुधवारी संपलेल्या २०२५ सालच्या डिसेंबर या एकाच महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी १६० कोटी डॉलर्स इतक्या अवाढव्य रकमेचे भारत सरकारचे रोखे बाजारात फुंकले&period; यात भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेणाऱ्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा समावेश नाही&period; ही १६० कोटी डॉलर्स रक्कम आहे ती फक्त भारत सरकारतर्फे विकल्या गेलेल्या रोख्यांतील गुंतवणूक काढून घेतली गेली त्याची&period; या अशा रोख्यांस सार्वभौम हमी &lpar;सॉव्हरिन गॅरंटी&rpar; असते हे लक्षात घेतल्यास हे रोखे फुंकले जाण्याची दखल घेणे महत्त्वाचे का&comma; हे कळेल&period; ही बाब इतक्यापुरतीच मर्यादित नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>भारत सरकारच्या रोख्यांतील गुंतवणूक एवढ्या प्रचंड संख्येने काढून घेतली जाण्याचा हा २०२० पासूनचा उच्चांक आहे&period; म्हणजे एकाच वेळी करोनोत्तर पर्यटक संख्येत घट होणे आणि करोनोत्तर रोखे विक्री वाढणे या दोन्ही घटना घडत असतील त्या गांभीर्याने घेणे गरजेचे ठरते&period; भारत सरकारचे रोखे ठेवण्यापेक्षा विकण्याकडे गुंतवणूकदारांचा अधिक कल आहे यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या रुपयाचे कमालीच्या वेगाने ढासळत चाललेले मूल्य&period; आज एक अमेरिकी डॉलर विकत घ्यावयाचा तर साधारण ९१ रु&period;&comma; सिंगापुरी डॉलरसाठी ७० रु&period; वा इंग्लंडच्या पौंडासाठी तर १२१ रुपयांच्या आसपास किंमत द्यावी लागते&period; ज्या इंग्लंडला आपण अर्थव्यवस्थेच्या आकारात मागे टाकल्याचा आनंद मिरवतो त्याच इंग्लंडच्या चलनाची किंमत भारतीय रुपयाची शब्दश&colon; लाज काढते&period; अर्थव्यवस्था आकाराबाबत आपल्यापेक्षा कित्येक पट लहान असलेल्या देशांच्या रोख्यांत गुंतवणूक करणे परदेशस्थ गुंतवणूकदारांस अधिक फायदेशीर वाटते&period; कारण त्या देशांच्या अर्थव्यवस्थांचा आकार लहान असला तरी त्यांच्या बाजारपेठा सशक्त आहेत&comma; त्यांच्या चलनास चांगले मोल आहे आणि त्यांच्या सरकारांची धोरणे पारदर्शी आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>तेव्हा आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर झेप घेत असताना त्यामागील या वास्तवाकडेही लक्ष देण्याची गरज आहे&period; अर्थव्यवस्थेचे लहानमोठेपण एकाच घटकावर अवलंबून नसते&period; त्यासाठी सर्व घटकांचा सम्यक विचार लागतो&period; तेव्हा अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर गेल्याने चवथीचा चंद्र उगवत असला तरी त्या चंद्रकोरीच्या दुरून दिसणाऱ्या चतकोरावरच सुख मानायचे का&comma; याचा विचार व्हावा हे बरे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version