spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक स्वतंत्र बैठक घेण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई :- राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा सविस्तर विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. राज्यातील सुमारे 3200 गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुंबईत आशा गटप्रवर्तकांच्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार मनीषा कायंदे, आमदार भावना गवळी, गटप्रवर्तक तसेच संघटनेचे प्रतिनिधी प्रवीण चौधरी आणि नेत्रदीपा पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आशासेविका, अर्धवेळ परिचर तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर गटप्रवर्तकांच्या प्रश्नांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि आरोग्यविषयक उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यात आशा गटप्रवर्तकांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना त्या आरोग्य विभाग आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील असून, सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Popular Articles