spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

यवतमाळच्या हिरा देशमुखची आंतरराष्ट्रीय युवा शिखर संमेलनासाठी निवड

– व्हिएतनामसाठी आज रवाना होणार

यवतमाळ :- येथील यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी हिरा राखी देशमुख हिची व्हिएतनाम येथे होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय युवा शिखर संमेलनासाठी निवड झाली आहे. या जागतिक मंचावर ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, उद्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी ती व्हिएतनाममधील ‘हो ची मिन्ह’ शहराकडे रवाना होत आहे.

या संमेलनासाठी देशभरातून अनेक तरुणांचे अर्ज आले होते. अत्यंत कठीण मुलाखत प्रक्रिया, नेतृत्व क्षमता आणि युवकांना प्रेरित करण्याची कौशल्ये या निकषांवर हिराची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संमेलनाचा संपूर्ण खर्च आयोजकांकडून केला जाणार आहे. हिरा देशमुख सध्या वायपीएस शाळेत अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. ती बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची धनी असून, अवघ्या १६ वर्षांच्या हिराच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. तिला रनिंगमध्ये सात, निबंध स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळाले आहेत. कविता, वादविवाद स्पर्धा, उत्कृष्ट संचालनासाठीही अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. नागपूर येथील एमयूएनबीमध्ये तिला ‘बेस्ट व्हर्बल मेंशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने अनेक व्यवसायिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. हिरा धनुर्विद्येत पारंगत असून तिला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड आहे. या आवडीमुळे ती विद्यार्थ्यांमध्ये समन्वयक म्हणूनही काम करते. झरी-जामणी येथील राजीव गांधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. राखी देशमुख यांची ती कन्या आहे. त्यांच्या राजराजेश्वरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही हिराचा सहभाग असतो. हिराच्या या यशामुळे यवतमाळच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील मुली जागतिक स्तरावर नेतृत्व करू शकतात, हे हिराने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले. हिराच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Popular Articles