– दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात विशेष शिक्षकांची महत्त्वाची भूमिका : सुहास गाडे
गडचिरोली :- समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व सहाय्यभूत सेवा उपलब्ध करून देणाऱ्या जिल्ह्यातील ५५ विशेष शिक्षकांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गाडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांनुसार मार्गदर्शन, सहाय्यभूत साधने आणि विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी शिक्षक करीत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांची तालुकानिहाय तपासणी करून गरजेनुसार रत्ननिधी फाउंडेशनच्या माध्यमातून चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गाडे यांनी दिली. पूर्णतः दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्मार्ट व्हिजन उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच सांकेतिक भाषेत अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अंगणवाडीपासून इयत्ता बारावीपर्यंतच्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा व क्षमतांचा अभ्यास करून वैयक्तिक शैक्षणिक आराखडा तयार करणे, घरी व शाळेत जाऊन अध्ययन-अध्यापनासाठी मार्गदर्शन करणे, आवश्यक शैक्षणिक साहित्य व सहाय्यभूत साधनांची निश्चिती आणि वाटपासाठी समन्वय साधणे अशी कामे त्यांच्यामार्फत केली जातात.
याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेणे, तपासणी शिबिरांमध्ये त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे, आवश्यक उपचार व शस्त्रक्रियांसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे, तसेच चित्रकला व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यातही ते योगदान देतात. विद्यार्थ्यांना दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी), शिष्यवृत्ती आणि निरामय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही विशेष शिक्षक सहाय्य करतात.
विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्या कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रेरक उजगरे यांनी केले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विशेष शिक्षक हे महत्त्वाचे आधार असल्याचे सांगून त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रेरक उजगरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे आणि उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजीव पारसेवार उपस्थित होते.








