spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बालकांमध्ये संस्कार आणि मराठी भाषेचा अभिमान रुजवणे आवश्यक – वनमंत्री गणेश नाईक

– नवी मुंबईत पहिले ‘बाल मराठी संमेलन 2026’चे आयोजन

नवी मुंबई :- बालपणापासूनच मुलांमध्ये मराठी भाषा, संस्कृती आणि लोकशाही मूल्यांचे संस्कार रुजवणे आवश्यक असून अशा संमेलनांमुळे बालमनात साहित्य, कला आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘बाल मराठी संमेलन 2026’ या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन आज नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी (साने गुरुजी बालनगरी) येथे वनमंत्री नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजात पाटील, न.मु.म.पा. उपमहापौर दशरथ भगत, न.मु.म.पा. स्थायी समिती अध्यक्ष अशोक पाटील, न.मु.म.पा. विरोधी पक्ष नेते विजय चौघुले, न.मु.म.पा. आरोग्य समिती सभापती डॉ. नाथ, नगर सेविका शोभना गावडे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव डॉ. किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, प्रसिध्द सुलेखनकार पद्मश्री अच्यूत पालव, मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक, लेखक व अभिनेता महेश कोठारे, जेष्ठ साहित्यीक डॉ. सदानंद मोरे, जेष्ठ बालनट्यकर्मी प्रतिभा मतकरी, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, जेष्ठ नाटयकर्मी सुप्रिया विनोद, तसेच मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह मोठया संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी संत परंपरेचा उल्लेख करत संत ज्ञानेश्वरांच्या ‘हे विश्वची माझे घर’ या विचाराचा संदर्भ दिला. धर्म, जात, पंथ, वर्ण आणि वर्ग यांमधील भेद दूर करून मानवतेचा संदेश देण्याचे काम संतांनी केले असून महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेच्या गौरवाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला दिलेला अभिजात भाषेचा दर्जा हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठी भाषिकांची ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाला नवी दिशा मिळाली आहे.

बालसाहित्य संमेलनाच्या संकल्पनेचा उल्लेख करताना त्यांनी क्रिकेटमधील अंडर-19 स्पर्धेचे उदाहरण देत सांगितले की, जसे क्रीडा क्षेत्रात लहान खेळाडूंना व्यासपीठ मिळते, तसेच साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातही मुलांना संधी देणे आवश्यक आहे. बालपणापासूनच मुलांना लोकशाहीची प्रक्रिया, सामाजिक जबाबदारी आणि संस्कार यांची जाणीव करून देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई हे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिकांचे शहर असून येथे आयोजित करण्यात आलेले बाल मराठी संमेलन हे स्वागतार्ह पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात अशा उपक्रमांमुळे मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रवाह अधिक गतिमान आणि प्रकाशमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी बाल मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना लहानपणापासूनच बालमनाचे मनोरंजन करणारे विषय आणि पात्रे साकारत आल्याचे सांगितले. ‘बोलका बाहुला’सारख्या पात्रांमधून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी चित्रपटसृष्टीसाठी आपण नेहमीच बांधील राहिलो असल्याचे सांगत त्यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. तसेच बालकांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी बाल मराठी संमेलनासारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी बालकांमध्ये मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी बाल मराठी संमेलनासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तंत्रज्ञानाच्या युगातही मुलांनी मराठी वाचन, लेखन आणि बोलण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी प्रास्ताविक भाषणात या दोन दिवसीय कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी आयोजक, मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला दि. 16 व 17 दोन दिवसांत संमेलनाच्या निमित्ताने बालनाट्य, परिसंवाद, साहित्यिक संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Popular Articles