– स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि व्याघ्र संवर्धनावर प्रकाश; उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांचा संवाद
हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने भंडारा जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी १८ मार्च रोजी पिटेझरी पर्यटन गेट येथे एक दिवसीय विशेष ‘पत्रकार अभ्यास दौऱ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन कार्य, वन व्यवस्थापन आणि जैवविविधतेची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
व्याघ्र संवर्धन आणि वन व्यवस्थापनामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांना प्रकल्पाच्या कार्याबाबत अवगत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी जंगल सफारीच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पातील विविध वनक्षेत्र, नैसर्गिक जलस्रोत आणि वन्यजीवांच्या अधिवासाची पाहणी केली. नशिबाची साथ लाभल्याने पत्रकारांना वाघ, बिबट्या, रानगवा, हरीण आणि विविध दुर्मिळ पक्षी प्रजातींचे दर्शन घडले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला बफर क्षेत्र प्राप्त झाल्यामुळे स्थानिक गावांतील बेरोजगारांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पाच्या एकसंघ नियंत्रणामुळे पर्यटनात वाढ होऊन स्थानिकांचे उत्पन्न वाढण्यास कशी मदत होईल, यावर या दौऱ्यात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे (साकोली) उपसंचालक प्रितमसिंग कोडापे म्हणाले की, “व्याघ्र संवर्धनासाठी आम्ही कॅमेरा ट्रॅपिंग, अद्ययावत गस्त व्यवस्था आणि जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर राबवत आहोत. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आमच्यासाठी मोलाचा आहे.” तसेच निसर्ग शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांप्रती ओढ निर्माण केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अभ्यास दौऱ्यामुळे पत्रकारांना प्रकल्पाच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाजूंची सखोल माहिती मिळाली. या माध्यमातून समाजात वन्यजीव संरक्षणाबाबत अधिक व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सहाय्यक वन संरक्षक मनिषा चव्हाण, सुहास कांबळे, वन परिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे, सूरज गोखले यांच्यासह इतर क्षेत्रीय वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




