spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात वाळू तस्कराची दहशत संपली! ‘धोकादायक गुंड’ रोहित मारवाडेवर एमपीडीए; रवानगी जिल्हा कारागृहात

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून परिसरात दहशत माजविणाऱ्या खमारी (बुटी) येथील सराईत वाळू तस्कर रोहित दिलीप मारवाडे (२२) याच्यावर अखेर जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी रोहित मारवाडे याच्याविरुद्ध ‘एम.पी.डी.ए.’ (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश पारित केले असून, त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत येणाऱ्या खमारी/बुटी येथील रहिवासी असलेला रोहित मारवाडे हा सन २०२४ पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. तो आपल्या गावाजवळील तसेच बेलगाय, गांडवी शिवारातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करत होता. ही चोरटी वाळू भंडारा शहर व आजूबाजूच्या गावात विकून तो चैनीचे जीवन जगत होता. त्याच्या या कृत्यांमुळे आणि खुनसी प्रवृत्तीमुळे परिसरात त्याची ‘धोकादायक वाळू तस्कर’ अशी ओळख निर्माण झाली होती.

कारधा पोलीस ठाण्यात रोहितवर अवैध वाळू उपसा आणि चोरट्या वाहतुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट, त्याने शासकीय मालमत्तेची चोरी करून सार्वजनिक सुव्यवस्थेला आव्हान दिले होते. त्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत होते, ज्यामुळे त्याच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे झाले होते.

पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने मोठी कारवाई

अशा सराईत गुन्हेगाराचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात कारधा पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी १७ मार्च २०२६ रोजी रोहित मारवाडे याला स्थानबद्ध करून कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने पार पाडली. जिल्ह्यातील इतरही वाळू तस्करांचा गुन्हेगारी अभिलेख तपासला जात असून, अशा समाजविघातक व्यक्तींवर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.