spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बापाच्या घामाची किंमत जाणून घ्या, प्रा.वसंत हंकारे यांचे आवाहन‎

पांढरकवडा :- या जगात आई वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुला – मुलीवर कुणी करू शकत नाही, त्यामुळे जीव गेला तर बेहत्तर पण आपल्या बापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, असे आवाहन व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी केले. स्वर्गात गेलेल्या आई वडिलांना कोणताही देव परत आणू शकत नसल्याने जो पर्यंत आपल्या आई वडिलांचा श्वास चालू आहे तो पर्यंत त्यांच्या श्वासावर प्रेम करा, असेही ते म्हणाले.

युवा टायगर फोर्स तर्फे आयोजित “न समजलेले आई-बाप” या समाजप्रबोधनात्मक सोहळ्यात ते बोलत होते. पांढरकवडा शहरातील माउली सेलिब्रेशन हॉल येथे झालेल्या कार्यक्रमास ठाणेदार एल.डी तावरे, गटशिक्षणाधिकारी राजु मेश्राम, नायब तहसीलदार राजु मोट्टेमवार, माजी नगराध्यक्ष शंकर बडे, माजी नगराध्यक्षा वैशाली नहाते, युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिड्डेवार, संयोजक अंकित नैताम, संजय झोंटीग आदी उपस्थित होते. प्रा. हंकारे म्हणाले, शत्रूंच्या महिलांना सुद्धा सन्मानाची वागणूक देणारे छत्रपती शिवराय हे आपले आदर्श आहेत. ज्यांच्या घरातील आई बाप जास्त आनंदी ते कुटुंब श्रीमंत कुटुंब आहे. आई वडिलांचे कष्ट विसरू नका. तुमच्या दोन्हीही गालाचा पहिला मुका आई घेते, तर डोळ्यातील आनंदाश्रूंचा पहिला थेंब तुमच्या तोंडावर टाकणारा बाप पहिला असतो. छत्रपती संभाजीराजेंचे ३९ दिवस हाल केले. मात्र मला माझे स्वराज्य व वडील प्रिय आहेत हे उत्तर देत संभाजीराजांनी प्राणाचे बलिदान दिले. ज्यांच्या बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही अशांच्या प्रेमात पडू नका व व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपला बाप झोपला असतांना त्याच्या बनियनला किती भोके आहे हे पहा. प्रसूती वेदना सहन करताना आई माझा जीव गेला तरी चालेल मात्र पोटातील गोळ्याला वाचवा, अशी विनंती डॉक्टरला करते. त्या वेदना समजून घ्या. भरल्या ताटावरून उठून तुमच्या गरजा भागवणाऱ्या बापाच्या घामाची किंमत जाणून घ्या. अनाथ आश्रमात जाऊन ज्यांना आई बाप नाहीत त्यांचे दुःख समजून घ्या, असे ते म्हणाले.

सोशल मीडिया मधील ओळखीला बळी पडून ऐन तरुणी अनेक ‘चुका ‘करून बसतात व त्याचे प्रायश्चित सर्वात जास्त समाजात व इतर ठिकाणी बाप नावाच्या व्यक्तीला द्यावे लागते, क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता बुद्धीने व आर्थिकरित्या स्वावलंबी बना यासंदर्भातील विविध क्षेत्रातील उदाहरणे देत, बाप म्हणजे काय हे प्रा. हंकारे यांनी संवेदनशीलरित्या सांगितले. या व्याख्यानासाठी आलेल्या अनेक पालकांना व मुलींना अश्रू अनावर झाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.