हंसराज, भंडारा लाखनी :- स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि श्रमिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गणेश कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले.
ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात डॉ. गणेश कापसे यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास, महाराष्ट्र दिनाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच कामगार दिनाचे श्रमिकांच्या हक्कांसाठी असलेले योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या प्रगतीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि शिक्षक यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जाणीव जोपासत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. सागर वारंगने, डॉ. शेंडे, डॉ. वंजारी, डॉ. टेंभुर्णे, डॉ. करवाडे, प्रा. सूर्यवंशी, प्रा. कुकडे, प्रा. सपाटे, प्रा. सिंगनजुडे, प्रा. हलमारे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विलास पाटील वाघाये, दीपक वाघाये, बांडेबूचे , भोयर, विशाल हनवतकर, शहारे, कुंभरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि श्रमिकांविषयी आदर निर्माण करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.