spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मानेगावातील राष्ट्रीय महामार्ग ओव्हरब्रिजचे काम संथ; निकृष्ट दर्जाविरोधात ग्रामस्थ आक्रमक

– कामाच्या पाहणीसाठी खा. डॉ. प्रशांत पडोळे घटनास्थळी; गुणवत्तापूर्ण बांधकामासह झाडतोडीच्या चौकशीची मागणी तीव्र

हंसराज भंडारा :- लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरील ओव्हरब्रिजचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अपूर्ण काम, वारंवार होणारा विलंब आणि बांधकामातील त्रुटींमुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गावकऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान संबंधित सीमा कंपनीकडून सुरू असलेल्या बांधकामात अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. अनेक ठिकाणी बांधकामाला भेगा पडलेल्या असून कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी कामावर आवश्यक पाणी न घातल्याने दर्जा खालावत असल्याची तक्रार मांडली.

ओव्हरब्रिजचे काम रखडल्याने सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुले, महिलावर्ग तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून “प्रथम सुरक्षिततेच्या दृष्टीने ओव्हरब्रिज पूर्ण करा, त्यानंतरच इतर कामे करा,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन डॉ. पडोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाच्या निकृष्ट दर्जाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हाधिकारी आणि संबंधित देखरेख अधिकाऱ्यांना काम तातडीने, गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षिततेच्या निकषांनुसार पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. उत्खननातील साहित्य दुसरीकडे विक्री केल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी सीमा कंपनीवर केला असून या प्रकरणाचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, भंडारा ते मुजबी राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वर्षे जुनी मोठी झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. झाडतोडीसाठी नेमकी कोणत्या विभागाने परवानगी दिली, किती झाडांची कत्तल करण्यात आली आणि पर्यायी वृक्षारोपणाची कोणती उपाययोजना केली, हे प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. ओव्हरब्रिजचे काम तात्काळ पूर्ण करून झाडतोड प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मानेगाववासीयांनी प्रशासनाला दिला आहे.

Popular Articles