मुंबई :- मुंबईतील गणेशोत्सवाला कॉर्पोरेट स्वरुप आले असून मराठी सण आपण आता गुजराती कंपन्यांच्या हाती देणार आहोत का, असा रोकडा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. गणेशोत्सव हा मराठी मातीतील सण होता. मात्र, आता मुंबईतील गणेश मंडळं कॉर्पोरेट वॉरचा भाग होणार असतील, याच्यापेक्षा दुर्दैव नाही. आम्हाला उद्या गणेशोत्सवात फक्त गरबा बघायचा आहे का, गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात देऊन. याची सुरुवात गेल्यावर्षी लालबागच्या राजाने केली, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ‘लालबागचा राजा’ मंडळावर टीकास्त्र सोडले.
‘लालबागचा राजा’ मंडळाने गेल्यावर्षी गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात दिला. ही अत्यंत दुर्दैवीच गोष्ट आहे. गणेशोत्सव थाटामाटात साजरा करायला पैसे लागतात, पण किती पैसे लागतात तुम्हाला? आज लालबागचा राजा मंडळाकडे कोट्यवधी रुपये जमा होतात ना, लोकं स्वत: तुम्हाला देणग्या देतात, मग किती पैसे लागतात तुम्हाला, कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला तिकडे. अनंत अंबानी असा काय मोठा सल्ला देतात, जो इतकी वर्षे तुम्हाला मिळाला नाही. अनंत अंबानी यांना कुठल्या कारणासाठी सल्लागार म्हणून नेमले आहे? गणेशोत्सव मंडळाची कंपनी करायची आहे का, त्यासाठी तुम्ही अनंत अंबानींना सल्लागार म्हणून घेतलेय. आता त्यांचे बघून आता अदानी आले. उद्या आता जेएसडब्ल्यू येईल, गोदरेज येईल, मग गणेशोत्सव मंडळं तुम्हाला कॉर्पोरेट वाॉरचे ठिकाण बनवायचे आहे का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मराठी मातीतील आणि मराठी माणसाचा सण आहे. तो या उद्योगपतींच्या हातात तुम्हाला द्यायचा आहे का? आता गणपतीत आम्ही गरबा चालू करायचा का आम्ही, आमचे मराठी सण तुम्ही गुजराती कंपन्यांच्या हाती देणार आहात का? याचा सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही, लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना. ते माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांनी ही जी काही भूमिका घेतली आहे, अत्यंत चूक आहे. अदानी-अंबानी उद्योगपती आहेत, ते नफा दिसल्याशिवाय काहीच करत नाहीत. गणपती हे मार्केटिंगचं ठिकाण आहे का? तुम्ही आमच्या देवाला गणपतीला मार्केटिंगसाठी वापरताय का? मला या गोष्टीची प्रचंड चीड येते, असे संदीप देशपांडे म्हटले. याचा सर्व मराठी गणेशोत्सव मंडळांनी कृपया नीट विचार करा, आत्मपरीक्षण करा, आपण जे करतोय ते बरोबर आहे का? नाहीतर उद्या, 50 वर्षांनी लालबागचा राजा आणि चिंतामणी हे गणपती उद्योगपतींच्या नावाने ओळखले जातील. हे तुम्हाला चालणार आहे का, याचा विचार मराठी मुलांनी केला पाहिजे, मला हे प्रामाणिकपणे वाटते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले
.





