नागपूर :- महापौर निता ठाकरे यांनी आज (ता. ११) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांचा विभाग निहाय आढावा घेतला. तीन तास चाललेल्या बैठकीत शहरातील उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे तसेच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, सर्व बाजारपेठामध्ये रात्री स्वच्छता करणे, दुषित पाण्याच्या समस्यांवर उपाययोजना व पादचाऱ्यांसाठी फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कडक पाऊले उचलण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या ) बोरकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्यासह मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त तथा निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त गणेश राठोड, उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त राजेश भगत, नगररचना विभागाचे उपसंचालक गिरीश गोडबोले, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये यांच्या सह सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

शहरात नागपूर महानगरपालिका तसेच राज्य सरकारच्या निधीतून प्रगतीपथावर असलेल्या विकास प्रकल्पांची माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडून महापौर निता ठाकरे यांनी घेतली. नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील मालमत्ता कर तसेच इतर माध्यमातून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्याचे निर्देश दिले. शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, मनपाच्या उद्यानांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच घनकचरा व्यवस्थापन योग्यरितीने करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी विविध सूचनाही यावेळी करण्यात आल्या. शहरात रेन हार्वेस्टिंगचा अधिकाधिक नागरिकांनी वापर करावा, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे तसेच नियमांमध्ये तशी सक्त तरतूद कराव्या, असेही यावेळी सुचविण्यात आले. शहरातील मोकाट श्वानांच्या बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे तसेच विधान सभा क्षेत्र निहाय प्रत्येकी २ इंग्रजी शाळा सुरू करणे, अंबाझरी तलावातून जलपर्णी कशी हटविण्यात येईल याची उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले .




