– मतदान यंत्रांचे सिलिंग दि. 28 व 29 ला; उमेदवार किंवा प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार
– निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांची माहिती
यवतमाळ :- यवतमाळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 28 व 29 नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे सकाळी 10 वा.पासून मतदान यंत्राचे सिलिंग करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यादरम्यान उपस्थित राहू शकतात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले आहे.
या निवडणूकीसाठी एकूण 2 लक्ष 32 हजार 315 मतदार असून 248 मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदान केंद्रे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहेत. या प्रभागात एकूण 13 मतदान केंद्रे आहेत.
अध्यक्षपदासाठी एकूण 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सदस्य पदासाठी एकूण 299 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वाधिक 20 उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूक लढवत आहेत.
मतपत्रिकेवर पक्षाचा उल्लेख नाही
अध्यक्ष पदासाठीची मतपत्रिका ही फिकट गुलाबी रंगांमध्ये असणार आहे. प्रभागातील ‘अ’ जागेसाठी पांढरा रंग व प्रभागातील ‘ब’ या जागेसाठी फिकट निळा रंगाची मतपत्रिका असणार आहे.
मतपत्रिकेवर केवळ उमेदवाराचे नाव व चिन्ह याचाच उल्लेख असतो. मतपत्रिकेवर पक्षाचा उल्लेख नसतो.
51 संवेदनशील मतदान केंद्रे
नगर परिषद यवतमाळ सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 51 इतकी वाढविण्यात आली आहे. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी दुसऱ्या दिवशी लगेच 03/12/2025 ला सकाळी 10:00 वाजेपासून सुरू केली जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिका-यांनी कळवले आहे.




