spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरफोडीचा चोर १२ तासांत जेरबंद करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त, आरोपी निघाला घराशेजारचाच!

– सीसीटीव्ही अन् पोलिसांच्या तर्कशक्तीने आरोपीचा पर्दाफाश; ४.६१ लाखांचा चोरीचा ऐवज व मोबाईलसह ४.६९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कामठी :- घराला कुलूप लावून कुटुंबीय आठवडी बाजारात गेले आणि मागे घरफोडी करून चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल ४ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र नवीन कामठी पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेत अवघ्या १२ तासांत घरफोडीचा छडा लावत आरोपीला जेरबंद केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी पकडलेला आरोपी चोरी झालेल्या घराशेजारीच राहणारा निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रोहित नरेश गेडाम (४३, रा. जयभीम चौक, कामठी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला ४ लाख ६१ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार

जयभीम चौक येथील धान्य व्यावसायिक सुरेंद्र लोणारे हे शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी पत्नी व मुलीसह सकाळी ९ वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात धान्य विक्रीसाठी गेले होते. घराला कुलूप लावून कुटुंबीय बाहेर पडल्याची संधी साधत आरोपीने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

बेडरूममधील लॉकरमध्ये ठेवलेले ७५ हजार रुपये रोख आणि सोन्याचे मौल्यवान दागिने, असा लाखोंचा ऐवज आरोपीने लंपास केला.

रात्री सुमारे ८ वाजता लोणारे कुटुंबीय घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील सामानाची पाहणी केली असता लाखो रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू केली.

फुटेजमध्ये आढळलेल्या संशयास्पद हालचाली, घटनास्थळावरील परिस्थिती आणि पोलिसांच्या तर्कशक्तीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. अखेर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामुळे नवीन कामठी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांच्या तपास कौशल्याची चुणूक दाखवली.

शेजारीच चोर निघाल्याने नागरिकांमध्ये खळबळ

या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे लाखोंची घरफोडी करणारा आरोपी हा फिर्यादीच्या घराशेजारीच राहणारा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘ओळखीचा माणूसच घरफोडीमागे?’ या चर्चेला परिसरात उधाण आले आहे.

नवीन कामठी पोलिसांनी दाखविलेल्या या जलद तपासामुळे चोरीचा मुद्देमाल अल्पावधीतच परत मिळाल्याने लोणारे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वनिता शाहू, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश नालटे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे, पोलीस कर्मचारी दीपककुमार चोले, नितेश नवघडे, नसीम अन्सारी, विलास चिंचुलकर व आकाश टेकाम यांनी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.