spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हुतात्म्यांच्या त्यागाला कामठीत कृतज्ञ अभिवादन; क्रांती दिनी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा

– माजी जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली; देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांना नमन

कामठी :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा त्याग कधीही विसरता येणार नाही, या कृतज्ञ भावनेत कामठी शहराने क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना अभिवादन केले. कामठी येथील हुतात्मा स्मारकावर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात माजी जि.प. अध्यक्ष तथा कामठी विधानसभा मतदारसंघाचे नेते सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही; असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करणे, लोकशाही व संविधानाची मूल्ये अधिक बळकट करणे तसेच सामाजिक एकता आणि बंधुभाव टिकवून ठेवणे हीच हुतात्म्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सुरेशभाऊ भोयर यांनी यावेळी केले.

हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण करताना स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षमय दिवसांना उजाळा देण्यात आला. ज्या मातांनी आपल्या मुलांना देशासाठी गमावले, ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांच्या विरहाचे दुःख सहन केले आणि ज्यांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वतःचे वर्तमान अर्पण केले, त्यांच्या त्यागामुळेच आजची पिढी स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे, या भावनेने यावेळी वातावरण भारावून गेले.

यावेळी कामठी शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष कृष्णाजी यादव, नगरसेवक धीरज यादव, गटनेते काशीनाथ प्रधान, साजिद अन्सारी, अनिल सूर्यवंशी, नीरज लोणारे, सुमेध रंगारी, प्रतिमा गजभिये, ममता कांबळे, मीर आरिफ अली, सलामत अली, साजिद कमाल अन्सारी, वसिफ अन्सारी, राजेश कांबळे, दिनू नागदेवे, आशिष मेश्राम, अलंकार गजभिये, बंटी घोडेस्वार, महिला काँग्रेस अध्यक्ष इशरत खान, कीर्ती नागदेवे, सुषमा मेश्राम, सिंधू मेश्राम, सत्यफुला खोब्रागडे, सुमन डंभारे, भारती वासनिक, परवीन बानो शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.