spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरकुल घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू असतांना करणवाडीत मनरेगा मजुरी हडपल्याचा नवा आरोप

पांढरकवडा :- केळापूर तालुक्यातील घरकुल योजनेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित असतानाच, आता करणवाडी येथे ‘मनरेगा’ अंतर्गत मिळणाऱ्या मजुरीत मोठा अपहार झाल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. सन २०१६ पासून घरकुल मजुरीचे पैसे मूळ लाभार्थ्यांना न देता परस्पर मर्जीतील लोकांच्या बँक खात्यात वळवल्याचा गंभीर आरोप येथील लाभार्थ्यांनी केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

करणवाडीतील शासकीय मनरेगा मजुरीवर नियमांनुसार, घरकुल मंजूर झालेल्या प्रत्येक गरजू लाभार्थ्याला स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) अकुशल मजुरी थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र, करणवाडी येथील तत्कालीन रोजगार सेवकाने मूळ लाभार्थ्यांची नावे मस्टरवर न दाखवता अथवा दिशाभूल करून सन २०१६ पासून स्वतःच्या मर्जीतील व ओळखीच्या व्यक्तींच्या खात्यावर हा निधी परस्पर जमा केल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष घाम गाळून घरे बांधणारे गरीब लाभार्थी मात्र हक्काच्या मजुरीपासून वंचित राहिले आहेत.

तालुक्यातील घरकुल योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असतानाच नवा घोटाळा समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

केळापूर तालुक्यात आधीपासूनच अपूर्ण घरांना अनुदान वाटप, कागदोपत्री पूर्तता आणि प्रत्यक्ष पाहणी न करता निधी वितरित झाल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. ही समिती ग्रामपंचायतींचे अभिलेख, लाभार्थी याद्या, प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती तपासत आहे किंवा नाही यासाठी नागरिकांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे. अशातच करणवाडीतील मजुरी अपहाराच्या नव्या तक्रारीमुळे संपूर्ण तालुक्यात घरकुल वाटप व अंमलबजावणीतील त्रुटींवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपहार करणाऱ्या रोजगार सेवकासह संबंधित दोषींवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच गैरव्यवहार झालेली रक्कम संबंधितांकडून वसूल करून मूळ व पात्र लाभार्थ्यांना त्यांची हक्काची मजुरी तात्काळ वितरित करावी. व प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन न्याय न दिल्यास वरिष्ठ स्तरावर तक्रार नोंदवून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा संतप्त घरकुल लाभार्थ्यांनी दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.