नागपूर :- उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक भागांतील विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडणे, कुलर व इतर उन्हाळी गरजांसाठी वाढलेला पाण्याचा वापर तसेच दाट लोकवस्तीच्या भागांतील वाढती मागणी यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होतो.
अधिक पाणी व जास्त दाब मिळविण्यासाठी काही नागरिक महानगरपालिकेच्या जलवाहिन्यांना थेट जोडून बेकायदेशीर “टुल्लू पंप” वापरत असल्याचे आढळून आले आहे. यावर्षी अनेक खासगी विहिरी व बोअरवेलमधील पाणी सांडपाण्यामुळे दूषित झाल्याने नागरिकांचा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अधिक अवलंब वाढला असून टुल्लू पंपांचा वापरही वाढला आहे.
टुल्लू पंपांचा वापर बेकायदेशीर असून त्यामुळे जलवितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. एका टुल्लू पंपामुळे परिसरातील किमान 10 घरांमध्ये पाण्याचा दाब कमी होऊ शकतो. परिणामी शेजारील ग्राहकांना कमी दाबाने पाणी मिळते किंवा काही ठिकाणी पाणीपुरवठा बाधित होतो.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यूने नागपूर पोलिसांच्या सहकार्याने शहरभर विशेष मोहीम राबविली आहे. मागील १५ ते २० दिवसांत (१३ मे ते आतापर्यंत) विविध भागांतून २०६ बेकायदेशीर टुल्लू पंप जप्त करण्यात आले आहेत.
कारवाई प्रामुख्याने खालील भागांमध्ये करण्यात आली आहे:
नेहरू नगर झोन: नंदनवन झोपडपट्टी, आदर्श नगर, प्रेम नगर परिसर
आशी नगर झोन: पांडे वस्ती, संघर्ष नगर, मानव नगर, खुशी नगर
धरमपेठ झोन: चिंतामणी नगर, मेट्रो सिटी सोसायटी, सुरेंद्रगढ
सतरंजीपुरा झोन: पाचपावली, ठक्करग्राम, कळमना, चित्रशाळा नगर, वाजपेयी नगर, बेले नगर, विनोबा भावे नगर, विष्णादेवी नगर, कामगार नगर, बराईपुरा, राम नगर
NMC-OCW नागरिकांना आवाहन करते की, बेकायदेशीर टुल्लू पंपांचा वापर टाळावा आणि सर्वांना समान व पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी सहकार्य करावे. प्रत्येक नागरिकाला योग्य दाबाने पाणी मिळण्यासाठी जनसहभाग आणि जागरूकता आवश्यक आहे.
टुल्लू पंपांचा बेकायदेशीर वापर आढळल्यास नागरिकांनी NMC-OCW कडे तक्रार नोंदवावी, जेणेकरून आवश्यक कारवाई करता येईल.
पाणीपुरवठा, पाणीबिल किंवा इतर सेवांबाबत माहितीसाठी नागरिकांनी NMC-OCW हेल्पलाईन 1800 266 9899 वर संपर्क साधावा किंवा Nagpur Jal Grahak Sewa App चा वापर करावा.







