spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खासदार क्रीडा महोत्सवात श्रीपाद काळे यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पटकावले रौप्य पदक

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरच्या क्रीडा विश्वात एक नवा उत्साह निर्माण करणाऱ्या ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आठवे पर्व नुकतेच उत्साहात पार पडले. या महोत्सवात महावितरणच्या बुटीबोरी शहर शाखेचे सहायक अभियंता श्रीपाद काळे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर जलतरण स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. त्यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावून महावितरणचे नाव उंचावले आहे.

श्रीपाद काळे हे अभियंता असले तरी, खेळाच्या मैदानावर त्यांची कामगिरी एखाद्या व्यावसायिक जलतरणपटूसारखीच प्रभावी असते. आपली शासकीय जबाबदारी समर्थपणे पार पाडत असतानाच, स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने सराव करून त्यांनी हे यश मिळवले आहे. केवळ या महोत्सवापुरतेच नव्हे, तर ‘मास्टर्स’ वयोगटातील जलतरण स्पर्धांमध्ये त्यांनी दीर्घकाळापासून आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांच्या याच सातत्याचे फळ म्हणून त्यांना हे यश मिळाले आहे.

श्रीपाद काळे यांचे हे यश म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. यापूर्वी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या 20 व्या राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वाटीक्स स्पर्धेतही त्यांनी आपल्या जलतरण कौशल्याचा जबरदस्त आविष्कार घडवला होता. त्या स्पर्धेत त्यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोक्स प्रकारात रौप्य पदक आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक्स प्रकारात कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. आता खासदार क्रीडा महोत्सवातील या विजयामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या शानदार विजयानंतर आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग’चे संचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते श्रीपाद काळे यांना रजत पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीपाद काळे यांच्या या कामगिरीची दखल घेत महावितरण नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शजर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. “कामाचा ताण आणि आव्हाने असतानाही खेळातील आपली आवड जोपासत श्रीपाद काळे यांनी मिळवलेले यश इतर कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे,” अशा भावना वरिष्ठांनी व्यक्त केल्या आहेत. यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.