spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

NEP २०२०च्या ३-२-१ पॅटर्ननुसार शैक्षणिक बदलांवर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

– २०० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग; नवीन शैक्षणिक संरचना, अभ्यासक्रम व क्रेडिट प्रणालीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून लागू होणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत ३-२-१ पॅटर्ननुसार विज्ञान, वाणिज्य व मानव्यविद्या शाखांची शैक्षणिक संरचना, योजना आणि अभ्यासक्रम याबाबत प्राध्यापकांना सखोल मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शनिवारी ८ ऑगस्ट रोजी हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, ताजाबाद शरीफ, उमरेड रोड येथे कार्यशाळा उत्साहपूर्ण पार पडली. या कार्यशाळेला विज्ञान, वाणिज्य व मानव्यविद्या शाखांमधील २०० हून अधिक प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर; अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, अड्याळ; यशोदा कन्या कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर; मारिया कला व विज्ञान महाविद्यालय, देवळी, वर्धा; उम्मे सलमा कला व विज्ञान महाविद्यालय, नागपूर तसेच अंजुमन कला महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि आमदार सुधाकर अडबाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शादाब एज्युकेशन सोसायटी, नागपूरचे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल जब्बार होते. कार्यशाळेचे प्रमुख आयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ.शकिल अ.सत्तार यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. NEP २०२० अंतर्गत होणारे शैक्षणिक बदल, नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी तसेच बदलत्या शैक्षणिक वातावरणात शिक्षकांची भूमिका याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि आमदार सुधाकर अडबाले यांनी नवीन शैक्षणिक संरचना व योजनांबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.

उद्घाटन सत्रानंतर झालेल्या विविध शैक्षणिक सत्रांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ.उमेश पालीकुंडवार, अधिष्ठाता, विज्ञान शाखा; डॉ. शामराव कोरेटी, अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा; डॉ. तुषार चौधरी, अध्यक्ष, बोर्ड ऑफ स्टडीज, कॉमर्स तसेच डॉ. अब्दुल बारी, माजी प्राचार्य यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ३-२-१ पॅटर्नची रचना, नवीन अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये, क्रेडिट प्रणाली, विषयांची निवड व रचना, विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धती, बहुविषयक शिक्षण, शैक्षणिक नियोजन आणि मूल्यांकन पद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच NEP २०२०ची महाविद्यालयीन स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या विविध बाबींवरही चर्चा करण्यात आली.

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना प्राध्यापकांना आवश्यक असलेले शैक्षणिक नियोजन, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षणपद्धती विकसित करण्याबाबत कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन मिळाले. प्राध्यापकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Popular Articles