spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव

– अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात सन्मान सोहळा; भगवान नंदागवळी यांना गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी 

नवेगाव बांध :- महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये महसूल विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

अर्जुनी मोरगाव उपविभागातील उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील अनाथ मुलांसाठी अविरत सेवा व सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल ग्राम महसूल अधिकारी श्री. भगवान नंदागवळी यांचा सन्मान करण्यात आला. उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे यांच्या हस्ते त्यांना गौरवचिन्ह (मोमेंटो) व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे म्हणाल्या, “महसूल यंत्रणा ही शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. तलाठी व ग्राम महसूल अधिकारी हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत. ७/१२ उतारा, ई-फेरफार, वारस नोंद तसेच अतिक्रमण हटाव यांसारख्या विविध महसूलविषयक कामांमध्ये त्यांनी दाखविलेली तत्परता, जबाबदारी आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे.”

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रशासकीय कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यही समाजासाठी प्रेरणादायी ठरते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाला तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नायब तहसीलदार पेंदाम साहेब, खुशाल कावळे, मंडळ अधिकारी तसेच तहसील व उपविभागीय कार्यालयातील महसूल अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महसूल दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीसोबतच अनाथ मुलांसाठी अविरत सेवा देणाऱ्या भगवान नंदागवळी यांच्या कार्याची झालेली दखल हा गौरवाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कौतुक व्यक्त केले.

Popular Articles