– ३५ हून अधिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली नशामुक्तीची प्रतिज्ञा
कामठी :- नशेच्या वाढत्या विळख्यातून युवक आणि समाजाला मुक्त करण्यासाठी तसेच निरोगी, संस्कारक्षम आणि नशामुक्त समाजनिर्मितीच्या उद्देशाने कामठीत सुरू असलेल्या नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाला व्यापक जनसमर्थन मिळत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये व सामाजिक संस्थांमध्ये ३५ हून अधिक जनजागृती व सामूहिक प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात आले. या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नशामुक्तीचा संकल्प केला.
अभियानांतर्गत आशाराम कॉलेज ऑफ नर्सिंग, कामठी, पॉलिटेक्निक कॉलेज, नूतन सरस्वती विद्यालय, छावणी परिषद कामठी, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल, हरदास स्कूल, सरस्वती शिशु मंदिर, शिक्षक सहकारी स्कूल, पंचायत समिती यासह विविध संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये नशेचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. नशेपासून स्वतः दूर राहण्यासोबतच आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि समाजातील इतर घटकांनाही नशामुक्त जीवनासाठी प्रेरित करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिकरीत्या नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली.

अधिकारी, शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग
विविध कार्यक्रमांना प्रशासनिक अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची विशेष उपस्थिती लाभली. बीडीओ डोंगरे, बालपांडे, तभाने मॅडम, चाफले सर, डॉ. आमिर, गोडसे सर यांच्यासह अनेक शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियानात सहभाग घेतला.
नशामुक्तीचा संदेश विद्यार्थी आणि युवकांपर्यंत पोहोचविणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज असून, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी जनजागृती कुटुंब आणि समाजावरही सकारात्मक परिणाम घडवू शकते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
माउंट आबू येथून आलेल्या नशामुक्ती रथातून जनजागृती
माउंट आबू येथून नशामुक्तीचा संदेश घेऊन आलेले ब्रह्माकुमार मंगेश भाई यांनी विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या जीवनातील अनुभव सांगत नशेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच राजयोग मेडिटेशनचे महत्त्व समजावून सांगत सकारात्मक विचार, आत्मसंयम आणि श्रेष्ठ जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा दिली.
ब्रह्माकुमारी बहिणींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती
नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानातील विविध कार्यक्रमांचे मार्गदर्शन व आयोजन ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी आणि त्यांच्या सहकारी सेवाधारींनी केले. विद्यार्थ्यांमध्ये नशेविरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रबोधन करण्यात येत आहे.
‘नशेला नकार, जीवनाला होकार’चा संदेश
आतापर्यंत झालेल्या ३५ हून अधिक कार्यक्रमांमध्ये हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नशामुक्त समाजनिर्मितीचा संकल्प केला आहे. सामूहिक प्रतिज्ञेवेळी ‘नशेला नकार, जीवनाला होकार’ आणि ‘नशामुक्त युवा–नशामुक्त समाज’ या संदेशांनी परिसर दुमदुमून गेला.
हे अभियान केवळ प्रतिज्ञेपुरते मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकाला नशेच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत निरोगी, सकारात्मक आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची प्रेरणा देणारे जनआंदोलन बनावे, हा आयोजकांचा प्रयत्न आहे.
कामठीतील शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि विविध सामाजिक घटकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे नशामुक्ती अभियानाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. आगामी काळात अधिकाधिक संस्थांपर्यंत पोहोचून ‘नशामुक्त कामठी, नशामुक्त युवा आणि नशामुक्त समाज’ घडविण्यासाठी जनजागृती सुरू ठेवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.





