spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत ई-रिक्षांचा बेशिस्त धुमाकूळ; वाहतूक पोलिस झोपले आहेत का?

– मनमानी थांबे, बेदरकार वळणे अन् अचानक ब्रेक; संदीप कांबळे

कामठी :- कामठी शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, त्यात ई-रिक्षांच्या बेशिस्त वाहतुकीची भर पडली आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि वर्दळीच्या मार्गांवर ई-रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र आहे.

प्रवासी मिळविण्यासाठी अचानक रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा थांबविणे, मागून येणाऱ्या वाहनांचा विचार न करता वळणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे तसेच गर्दीच्या ठिकाणी अस्ताव्यस्तपणे रिक्षा उभ्या करणे, यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नियमभंगाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष?

ई-रिक्षांकडून खुलेआम वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असताना वाहतूक पोलिस झोपले आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्या ई-रिक्षाचालकांवर केवळ दिखाऊ कारवाई न करता कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याची गरज आहे.

ई-रिक्षांसाठी शहरात निश्चित थांबे, मार्ग आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा, त्यापूर्वीच वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Popular Articles