Home Blog Page 8

दहाव्या दिवशी ७ हजार २३ श्री गणेश मूर्तींचे विसर्जन

0

नागपूर :- शहरात गणेशोत्सवाचे आगमन झाल्यानंतर गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी मनपाचे शहरातील विविध ठिकाणी ४४७ वर कृत्रिम तलाव तयार केले आहेत. यानुसार गुरुवार (ता.२४) रोजी दहा दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून शहरातील ४४७ कृत्रिम तलावांमध्ये ७ हजार २३ मूर्तींचे ज्यातील ६ हजार ६८३ मातीच्या व ३४० पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या कृत्रिम तलावांना शोधण्यासाठी मनपाने दिलेल्या क्यूआर अथवा संकेतस्थळाचा उपयोग करून नागरिक पर्यावरण पूरक विसर्जन करू शकतात.

नागपूर महानगरपालिकेने शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात ४४७ कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती केली आहे. या विसर्जन कुंडांचे लोकार्पण महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते फुटाळा तलाव परिसरात करण्यात आले होते.

शहरात गणेशोत्सवाचे आगमन झाल्यानंतर गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी मनपाचे शहरातील विविध ठिकाणी ४४७ वर कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मोठ्या आकाराच्या गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज भागातील सरदार वल्लभभाई पटेल (कच्छीविसा) मैदान व कोराडी येथे कृत्रिम जलकुंड उभारण्यात आले आहे.

महापौर निता ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने श्री गणेशाचे आगमन झाले आहे. नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन तलाव, विहिरी किंवा नाल्यात करण्याऐवजी मनपाने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करावे. यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होणार नाही. यासाठी डीजीटल पद्धतीने नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती सुद्धा मिळत आहे.

दहा दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे विसर्जनासाठी मनपाद्वारे २२५ ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ४४७ कृत्रिम तलावांमध्ये ७ हजार २३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, यात ६ हजार ६८३ मातीच्या व ३४० पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

लक्ष्मीनगर झोनमध्ये ४१ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, दहाव्या दिवशी १ हजार ९४७ मातीच्या तर ४९ पीओपीच्या अशा एकूण १ हजार ९९६ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये ६९ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून, येथे ८२२ मातीच्या तर पीओपीच्या ४६ अशा एकूण ८६८ मूर्तींचे विसर्जन झाले. हनुमाननगर झोनमध्ये ५५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे १ हजार ५२० मातीच्या तर ५० पीओपीच्या अशा एकूण १ हजार ७० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोनमध्ये ३१ कृत्रिम तलावांमध्ये ५८१ मातीच्या तर ७९ पीओपीच्या अशा एकूण ६६० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नेहरूनगर झोनमध्ये ४७ कृत्रिम तलावांची व्यवस्था असून येथे ५११ मातीच्या तर ६० पीओपीच्या अशा एकूण ५७१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गांधीबाग झोनमध्ये ६९ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे ३१९ मातीच्या आणि ५ पीओपीच्या अशा एकूण ३२४ मूर्तींचे विसर्जन झाले. सतरंजीपुरा झोनमध्ये २८ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहे.येथे ३२६ मातीच्या आणि ४ पीओपीच्या अशा एकूण ३३० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. लकडगंज झोनमध्ये ४० कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे ३२५ मातीच्या आणि ४० पीओपीच्या अशा एकूण ३६५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आशीनगर झोन मध्ये २३ कृत्रिम तलावामध्ये ५० मातीच्या आणि ७ पीओपीच्या अशा एकूण ५७ मूर्तींचे, तर मंगळवारी झोनमधील ४० कृत्रिम तलावांमध्ये २५५ मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या सोबत पोलीस लाईन टाकळी येथे महानगपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात २७ मातीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच्या सरदार वल्लभभाई पटेल (कच्छीविसा) मैदान, गोरेवाडा रिंग रोड जलकुंड, आणि कोरडी जलकुंड अशा तीनही ठिकाणी प्रत्येकी १ कृत्रिम जलकुंड उभारण्यात आले आहे.

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी

0

– ६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित

– १० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी

गडचिरोली :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.० (२०२६)’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दि. २३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात आयोजित ६५० आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पुढील उपचारांची आवश्यकता आढळलेल्या ५०६ रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ सप्टेंबरपासून हे अभियान राबविण्यात आले. ग्रामीण, शहरी तसेच दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरात आरोग्य तपासणी, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, आवश्यक तपासण्या व औषधोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत देखील या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या समन्वयातून अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.

४८ हजार २९६ नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ

अभियानांतर्गत दि. २३ सप्टेंबरपर्यंत एकूण ६५० आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये २० हजार ९०३ पुरुष, २१ हजार ३०३ महिला आणि ६ हजार ९० बालके अशा एकूण ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरांमध्ये विविध आजारांच्या निदानासाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. कायचिकित्सा विभागांतर्गत १२ हजार २४२, बालरोग विभागात ३ हजार ६९३, स्त्रीरोग विभागात ३ हजार ७८, नेत्रविकार विभागात २ हजार ३३१, अस्थिरोग विभागात १ हजार ९७७, त्वचारोग विभागात १ हजार ९२५, कान-नाक-घसा विभागात १ हजार १९६ आणि शल्यचिकित्सा विभागात ८४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हृदयविकारासंदर्भात १ हजार १०४ नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर इतर आजार व व्याधींसाठी ३ हजार ९९७ नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यात आली.

१० हजार ८९४ रक्ततपासण्या; १ हजार २०३ ईसीजी

रोगनिदानासाठी आवश्यक तपासण्यांवरही अभियानात विशेष भर देण्यात आला. एकूण १० हजार ८९४ नागरिकांची मोफत रक्ततपासणी करण्यात आली, तर आवश्यकता आढळलेल्या १ हजार २०३ नागरिकांची ईसीजी तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणीसोबत रक्तदानाविषयीही जनजागृती करण्यात आली. विविध शिबिरांच्या माध्यमातून ६९० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

आभा आणि आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी

नागरिकांना शासकीय आरोग्य सुविधांशी जोडण्यासाठी अभियानादरम्यान विशेष नोंदणी करण्यात आली. त्याअंतर्गत २ हजार ३२ नागरिकांची ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करण्यात आली, तर १ हजार ८८२ नागरिकांची आयुष्मान भारत अंतर्गत ‘गोल्डन कार्ड’साठी नोंदणी पूर्ण करण्यात आली.

५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित

शिबिरांमध्ये केवळ प्राथमिक तपासणी न करता आजाराचे निदान झाल्यानंतर आवश्यक रुग्णांना पुढील उपचार व्यवस्थेशी जोडण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार पुढील अथवा उच्चस्तरीय उपचारांची आवश्यकता आढळलेल्या ५०६ रुग्णांना शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. यापैकी ५३ रुग्णांना अँजिओग्राफी व आवश्यक विशेष तपासण्यांसाठी पाठविण्यात आले आहे.

८५ नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा नोंदविली

अभियानाच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या आवाहनाला प्रतिसाद देत ८५ नागरिकांनी अवयवदानासाठी प्रतिज्ञा नोंदविली.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अभियानाच्या अंमलबजावणीबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. सर्वसामान्य व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरात मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना आवश्यक पुढील उपचारांशी जोडणे हा प्रशासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान देणारे गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संस्था, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचे कौतुक केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, शिबिरांमध्ये गंभीर आजारांचे निदान झालेल्या पात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून आवश्यक उपचारांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ आणि ‘सेवासंकल्प अभियानाच्या’ माध्यमातून आरोग्य तपासणीबरोबरच आवश्यक निदान चाचण्या, रक्तदान व अवयवदान जनजागृती, आरोग्य योजनांसाठी नोंदणी आणि गरजू रुग्णांना पुढील उपचार व्यवस्थेशी जोडण्याचे काम करण्यात आले.

जीआयएस प्रणालीद्वारे शहरातील पायाभूत सुविधांचे सुनियोजित नियोजन

0

– मनपा आयुक्त डॉ. विपीन यांचे निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरात होणाऱ्या विकासकामांना सुनियोजित करण्याच्या उद्देशाने तसेच नागरिकांपर्यंत अस्तित्वातील पायाभूत सुविधांची माहिती मिळावी या उद्देशाने मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेत गुरुवार (ता. २४) रोजी मनपा मुख्यालयात बैठक पार पडली. शहरातील विकासकामे आणि बांधकामावेळी येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी मनपाद्वारे जीआयएस प्रणालीचा वापर करून पायाभूत सुविधांचे योग्य नियोजन करण्यासंदर्भात आयुक्त डॉ. विपीन यांच्याद्वारे निर्देश देण्यात आले.

बैठकीत प्रभारी उपसंचालक श्री. ऋतुराज जाधव, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, प्रकल्प अभियंता राजीव गौतम, क्रेडआय नागपूरचे प्रतिनिधी तसेच मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून प्रस्तावित बांधकामासाठी परवानगी प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्यासोबतच शहरातील अस्तित्वात असलेल्या बांधकामे व पायाभूत सुविधांचे नकाशीकरण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मनपाचा मानस आहे.

 

भविष्यातील नागरी गरजांच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांचा अभ्यास करून विकासकामे सुनियोजित पद्धतीने राबविणे, तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधून बांधकामांदरम्यान येणाऱ्या अडचणी कमी करणे यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

शहरातील अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील उपलब्ध सुविधांची माहिती सहजपणे मिळावी, तसेच विकासकामांच्या नियोजनात पारदर्शकता व सुसूत्रता निर्माण व्हावी, यासाठी कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

सावनेरमध्ये काँग्रेसच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर ग्रामीणच्या गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात आज गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष राजा टाकसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सावनेर शहराध्यक्ष गोपाल घटे यांच्या नेतृत्वात सावनेर येथील काँग्रेस पक्षाच्या सुमारे ६० ते ७० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी जिल्हा महासचिव किरण झाडे, तुषार गायकवाड, जिल्हा सचिव संजय झोडापे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये आकाश नारनवरे, प्रणय नारनवरे, विशाल नारनवरे, पंकज नारनवरे, सुरेंद्र लांजेवार, शिशुपाल लांजेवार, मिथुन लांजेवार, मिथिन वाहाने यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून सावनेर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशी पक्ष संघटना मजबूत करणे, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामकाज आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा व संवाद करण्यात आला.

सावनेर परिसरात पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी उत्तम नागरी सुविधा उभारण्याला प्राधान्य द्या – डॉ. विपीन

0

– मनपा आयुक्तांसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली दीक्षाभूमी परिसराची संयुक्त पाहणी

नागपूर :- दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा भिंतीची योग्य व मजबूत व्यवस्था करण्यात यावी. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सोयीसुविधा देण्यासह इतर नागरी सुविधांला प्राधान्य द्यावे, सर्व व्यवस्था १४ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी (ता.२४) दीक्षाभूमी परिसराला येथे भेट दिली. यावेळी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम.,अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण माहेर, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, समाज कल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता विजय गुरूबक्षाणी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, राजेंद्र राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुल्हाने, मनपाचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, अग्निशमन विभागाचे /तुषार बारहाते, परिवहन प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी, स्मारक समितीचे प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), सामाजिक न्याय भवन परिसरातील पार्किंगच्या जागेवर शौचालयाची व्यवस्था, अंबाझरी तलाव परिसर येथे उभारण्यात येणाऱ्या स्थानगृहासह इतर व्यवस्थेची पाहणी केली.

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी परिसरातील स्वच्छतागृहे, जमिनीचे समतलिकरण आणि एकूणच स्वच्छता व्यवस्थेची सखोल पाहणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा चोख ठेवावी. याशिवाय कारागृह परिसरातील सर्व आवश्यक व्यवस्था येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी असेही निर्देश त्यांनी दिले. तर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व विभागांनी उत्तम समन्वय राखून नियोजित वेळेत कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

‘संपूर्ण भागीदारी महाआंदोलना’तर्फे २२ मागण्यांचे निवेदन

0

नागपूर :- आजाद समाज पार्टी (कांशीराम) आणि भीम आर्मी च्यावतीने ‘संपूर्ण भागीदारी महाआंदोलना’अंतर्गत विविध घटनात्मक, सामाजिक व आरक्षणासंदर्भातील २२ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या देशव्यापी आवाहनानुसार आयोजित या आंदोलनाचा उद्देश शोषित, वंचित, बहुजन, अल्पसंख्याक तसेच मागासवर्गीय समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी आवाज उठविणे हा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण व SC, ST, OBC महिलांसाठी ‘कोट्यातील कोटा’, लोकसभा- विधानसभेत OBC समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व, जातनिहाय जनगणनेत OBC साठी स्वतंत्र नोंद, उच्च न्यायव्यवस्थेत SC, ST, OBC प्रतिनिधित्व आणि उच्च न्यायिक आयोगाची स्थापना यांचा समावेश आहे.

तसेच OBC क्रीमी लेअरची उत्पन्नमर्यादा सुधारावी, पदोन्नतीत SC, ST, OBC आरक्षण लागू करावे, उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव रोखण्यासाठी प्रभावी कायदेशीर तरतुदी कराव्यात, SC- ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील नुकसानभरपाई वाढवावी, सरकारी योजना व अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात हिस्सेदारी द्यावी, सरकारी कंत्राटे व खरेदीमध्ये आरक्षण लागू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. खासगी क्षेत्रात व्यवस्थापन व नेतृत्वाच्या पदांवर वंचित घटकांना प्रतिनिधित्व, मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, आरक्षणाचा प्रलंबित अनुशेष भरणे, सरकारी सेवांमधील लॅटरल एंट्री व कंत्राटी पद्धतीला विरोध, विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात वसतिगृहांची निर्मिती तसेच माध्यम क्षेत्रात वंचित समाजाचे प्रतिनिधित्व वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.सफाई कामगारांना कायमस्वरूपी नियुक्ती, समान कामासाठी समान वेतन, सामाजिक सुरक्षा व पेन्शन देणे, सीवर व सेप्टिक टँक साफसफाईसाठी मानवी प्रवेश पूर्णपणे बंद करून आधुनिक यंत्रांचा वापर करणे, तसेच दुर्घटनेत सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाख रुपये मदत, सरकारी नोकरी व पुनर्वसन देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. आजाद समाज पार्टी (कांशीराम) व भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्या राष्ट्रपतींकडे पाठवाव्यात आणि संबंधित प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी निवेदन देते वेळी आजाद समाज पार्टी कांशीरामचे जिल्हा अध्यक्ष ओपूल तामगाडगे, जिल्हा सचिव विशाल बनसोड, सूरज पुराणिक, रोशन ठवरे, दीक्षा चवरे, अशीत पाटील, अमन पाटील, अश्विन पाटील, दीपक पाटील, बादल बनसोड, प्रथम पानसे, बाळा पाटील, साशंक भोयर, सौरभ गुप्ता, मयुर बागडे, श्याम चोपडे, सचिन जयस्वाल वंदना इंगळे (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष महिला ब्रिगेत) नेह राऊत (नागपुर जिल्हा अध्यक्ष महीला ब्रिगेट) राहुल जगताप (नागपूर जिल्हा सचिव) आकाश गाझ्भिये (नागपुर जिल्हा महासचिव) संघरतना गेडाम (नागपुर जिल्हा उपाध्यक्ष) पौर्णिमा वानखेडे (उत्तर नागपूर महासचिव) सीला वासनिक (नागपूर जिल्हा उपाध्यक्ष) शेखर उके (कामठी विधानसभा अध्यक्ष) शकील मदारी, पुरुषोत्तम तायवाडे, नायांशू लोखंडे, हर्ष डोंगरे प्रत्रकार संघाच्या सुजाता मसराम पत्रकार संघाचे वसंता पाटील इत्यादीची उपस्थिती होती.

आदिवासी आश्रमशाळा संस्था चालक संघटनेचे राज्यव्यापी पंचवार्षिक अधिवेशन २६ सप्टेंबर ला

0

– महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळा संस्था चालकां नी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कन्हान :- आदिवासी आश्रमशाळा संस्था चालक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे राज्य व्यापी पंचवार्षिक अधिवेशन चिटणीस सेंटर, सिव्हिल लाईन, नागपुर येथे आयोजित करून महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळा संस्था चालकांच्या विविध प्रश्न, प्रलंबित मागण्या तसेच आश्रमशाळांच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

शनिवार (दि.२६) सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आदिवासी आश्रमशाळा संस्था चालक संघटनेचे राज्यव्यापी पंचवार्षिक अधि वेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री तथा नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्य मंत्री आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

अधिवेशना मध्ये महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशा ळा संस्था चालकांच्या विविध प्रश्नांवर, प्रलंबित माग ण्यांवर तसेच आश्रमशाळांच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. संस्था चालकांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणुन देण्यासाठी आणि विविध प्रश्नांच्या प्रभावी पाठ पुराव्यासाठी या अधिवेशनात महत्त्वपुर्ण चर्चा होणार आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र सरोदे, महसचिव किशोर वानखेडे तसेच माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळा संस्था चालकांना या राज्यव्यापी पंचवार्षिक अधिवेशनास प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आदिवासी आश्रमशाळा संस्था चालकांची एकजुट अधिक मजबुत करण्यासाठी तसेच त्यांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रा तील सर्व आदिवासी आश्रमशाळा संस्था चालकांनी शनिवार (दि. २६) सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता चिटणीस सेंटर, सिव्हिल लाईन, नागपुर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री बाल गणेश उत्सव मंडल, किनखेड़े लेआउट, प्रभाग क्रमांक 5 में स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दाणी की सदिच्छा भेंट

0

नागपुर :- श्री बाल गणेश उत्सव मंडल, किनखेड़े लेआउट, प्रभाग क्रमांक 5 में गणेश उत्सव के पावन अवसर पर स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दाणी वखरे ने सदिच्छा भेंट देकर भगवान श्री गणेश का दर्शन एवं पूजन किया तथा मंडल के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं को शुभकामनाएँ दीं।

इस अवसर पर प्रभाग के नगरसेवक संजय चावरे,सहित जीतू ठाकुर, आमदार मिलिंद माने ,अमित पांडे, श्रीनाथ पांडे, खेमराज दमहे, सुमित साहू, राजेंद्र (सोनू) मिश्रा, राजेश साहू, राहुल तिलखेड़े, दीप सिंह दिग्वा, विनोद कावले, सागर सदावर्ती, निलेश बोरकर, अतुल ठाकरे, स्वप्निल येरपुडे, हर्षल, आर्यन चावरे , रोशनी सदावर्ती , वैशाली चावरे एवं सिमरन दवा ठाकरे ताई उपस्थित रहे।

मंडल की ओर से सभी अतिथियों का स्वागत एवं अभिनंदन किया गया। कार्यक्रम भक्तिमय एवं उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ।

नवसाचा गणपती : निनावे परिवाराची ६४ वर्षांची अखंड परंपरा

0

– दरवर्षी नवनवीन देखाव्यांतून सामाजिक संदेश; यंदा तेलंगणातील ‘अण्णा स्टाईल’ गणपती ठरतोय आकर्षण

– ‘परंपरा जुनी, कल्पना नवी’ या संकल्पनेतून गणेशोत्सवाची अनोखी वाटचाल

यवतमाळ प्रतिनिधी :-  श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा वारसा जपत निनावे परिवाराकडून गेल्या ६४ वर्षांपासून नवसाच्या गणपतीची अखंडपणे स्थापना करण्यात येत आहे. पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने सुरू असून, गणरायाच्या स्थापनेसह दरवर्षी साकारण्यात येणारे आगळेवेगळे देखावे हे या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

‘परंपरा जुनी, कल्पना नवी’ या संकल्पनेतून निनावे परिवाराकडून दरवर्षी गणेशोत्सवात नवनवीन देखावे साकारले जातात. केवळ सजावट किंवा आकर्षणापुरते मर्यादित न राहता या देखाव्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे गणपतीच्या दर्शनासोबतच नागरिकांना सामाजिक संदेशही मिळतो.

यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे तेलंगणातील प्रसिद्ध ‘अण्णा स्टाईल’ गणपती. या आगळ्यावेगळ्या स्वरूपातील गणरायाची मूर्ती आणि आकर्षक सजावट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरवर्षी निनावे परिवाराकडून साकारण्यात येणाऱ्या नवीन देखाव्याची नागरिक आतुरतेने वाट पाहतात. गणेशोत्सवाच्या काळात हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे परिवाराकडून सांगण्यात आले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत गणरायाची स्थापना करण्यात येते. त्यानंतर गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, गोंधळ यांसह आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन परिवाराकडून करण्यात येते. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकीची जोड मिळते.

या ६४ वर्षांच्या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पिढीने गणेशोत्सवाची ही परंपरा पुढे नेली आहे. ज्येष्ठांनी जपलेली श्रद्धा आणि भक्तीची परंपरा नव्या पिढीने कल्पकतेची जोड देत पुढे नेली आहे. त्यामुळे काळ बदलला तरी गणरायाप्रती असलेली श्रद्धा आणि उत्साह कायम असल्याचे चित्र निनावे परिवाराच्या गणेशोत्सवातून पाहायला मिळते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनापूर्वी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर मोठ्या मनाने आणि भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. सहा दशकांहून अधिक काळ सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आज केवळ एका कुटुंबाची श्रद्धा न राहता परिसरातील नागरिकांसाठीही आकर्षणाचा आणि आपुलकीचा विषय बनली आहे.

‘परंपरा जुनी, कल्पना नवी’ या विचारातून श्रद्धेला आधुनिक कल्पकतेची जोड देत निनावे परिवाराचा गणेशोत्सव यंदाही भक्ती, सामाजिक संदेश आणि आकर्षक देखाव्याचा सुंदर संगम ठरत आहे.

निर्विघ्न विसर्जनासाठी महावितरण सज्ज; ‘सुरक्षा प्रथम’ बाळगण्याचे आवाहन

0

नागपूर :- लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नागपूर शहर सज्ज झाले आहे. अनंत चतुर्दशीला ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात विसर्जन पार पडेल. विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. महापालिकेने शहरात 225 ठिकाणी तब्बल 447 कृत्रिम कुंड तयार केले असून, या सर्व भागांत अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

विसर्जन मिरवणुकीचे मुख्य मार्ग आणि विसर्जन स्थळांची पाहणी महावितरणच्या टीमने आधीच पूर्ण केली आहे. रस्त्यावरील विद्युत यंत्रणेची डागडुजी करण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिकारी व कर्मचारी विसर्जन संपेपर्यंत प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहणार आहेत.

उत्सवाच्या या उत्साहात विद्युत अपघात टळावेत, यासाठी महावितरणने नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांसाठी काही साध्या पण महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:

मार्गाची पाहणी करा: विसर्जनाला निघण्यापूर्वी मिरवणूक मार्ग व्यवस्थित तपासून घ्या. रस्त्यावरील विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारा आणि ट्रान्सफॉर्मरची माहिती ठेवा. विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही अशा योग्य उंचीच्या वाहनांचाच वापर करा.

दर्जेदार सामान वापरा: मंडप व मिरवणुकीतील सजावटीसाठी केवळ आयएसआय (ISI) मार्क असलेल्या चांगल्या दर्जाच्या वायर्स आणि उपकरणांचा वापर करा. उघड्या वायर्स किंवा कच्चे जोड धोक्याचे ठरू शकतात. जनरेटर व बॅटरी सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि ओल्या जागेवर विजेची उपकरणे वापरणे पूर्णपणे टाळा.

मिरवणुकीत खबरदारी घ्या: उंच मूर्ती असेल तर तारांपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी पुढे सतर्क स्वयंसेवक ठेवा. जनरेटर ट्रॉली इतर वाहनांपासून सुरक्षित अंतरावर असू द्या. मिरवणुकीतील प्रत्येकाला विजेच्या सुरक्षेबाबत आधीच कल्पना द्या.

विसर्जन स्थळावर काळजी: महापालिकेने ठरवून दिलेल्या कृत्रिम कुंडातच विसर्जन करा. पाण्यात उतरण्यापूर्वी आसपास तुटलेल्या वायर्स किंवा उघडे स्विचेस नाहीत ना, याची खात्री करा. मूर्तीसोबत विजेचे कोणतेही साहित्य पाण्यात टाकू नका.

आपत्कालीन प्रसंगी काय कराल?: कुठेही विजेची ठिणगी, तुटलेली तार किंवा उघडा बॉक्स दिसल्यास लगेच महावितरण किंवा पोलिसांना कळवा. दुर्दैवाने कोणाला विजेचा धक्का बसल्यास त्याला हाताने किंवा धातूच्या वस्तूने न शिवता, लाकडी काठी वा प्लास्टिकच्या साहाय्याने विजेपासून दूर करा आणि तात्काळ दवाखान्यात न्या.

गणेश विसर्जन हा आपल्या श्रद्धेचा सण आहे. या आनंदावर कोणतेही विरजण पडू नये म्हणून सर्वांनी ‘सुरक्षा प्रथम’ हा नियम पाळावा आणि उत्सव सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.