मुंबई :- भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार भाजपा फ्रेंडस् ऑफ बीजेपी प्रकोष्ठ प्रभारी श्रीमती उषा वाजपेयी यांनी फ्रेंडस् ऑफ बीजेपी प्रकोष्ठ संयोजक व सहसंयोजक पदाची घोषणा केली असून ती खालीलप्रमाणे आहे.
मुंबई :- राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या नावीन्यपूर्ण उपकरणाचा प्रभावी वापर करावा. तसेच औषध गुणवत्ता तपासणीसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा (एसओपी) अवलंब करून नियमित तपासणी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
आरोग्य भवन येथे औषधांच्या गुणवत्ता तपासणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी या उपकरणाच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या उपस्थितीत मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे राज्यातील आठ परिमंडळांसाठी प्रत्येकी एक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ औषध निर्माण अधिकाऱ्यांचे उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक परिमंडळातील जिल्ह्यांसाठी औषध तपासणीचे वेळापत्रक निश्चित करून प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीची कार्यवाही, त्याचे अनुपालन, तपासण्यात आलेल्या औषधांची संख्या आणि तपासणीचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करावा लागणार आहे.
महिनाभर विशेष तपासणी मोहीम
आरोग्य विभागाच्या सर्व आठ परिमंडळांमध्ये पुढील महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नव्याने प्राप्त झालेल्या औषधांसह आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या औषधसाठ्यातील नमुने यादृच्छिक पद्धतीने तपासण्यात येतील.
प्राथमिक तपासणी, नमुने पुढील तपासणीसाठी पाठविणे, पुष्टीकरण अहवाल प्राप्त झाल्यानंतरची कार्यवाही आणि त्याची नोंद ठेवणे यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत.
सर्व आरोग्य संस्था राज्यस्तरीय रुग्णालय कक्षाच्या अधिनस्त असल्याने ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’च्या वापराबाबतचे सनियंत्रण सहसंचालक, रुग्णालय स्तरावरील कक्षामार्फत करतील. संबंधित प्राधिकरण, रुग्णालय यंत्रणा आणि खरेदी यंत्रणेने संयुक्त पथके तयार करून तपासणीची कार्यवाही अधिक प्रभावी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
प्रत्यक्ष नमुन्यांवर प्रशिक्षण
औषधनिहाय नमुना तपासणी, उपकरण हाताळणी, तपासणीच्या निकालांचे विश्लेषण आणि नोंद व्यवस्थापन याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक विभागात प्रत्यक्ष नमुन्यांवर सराव केल्यास तपासणीतील अचूकता वाढण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या उपकरणांचा प्रभावी वापर करून क्षेत्रीय पातळीवर नियमित तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत औषध गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबविण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
· महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन
मुंबई :- महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व प्रसार करण्यासाठी टपाल विभागाने तयार केलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष टपाल तिकिटाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष कार्यक्रमात मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, गणेशभक्त आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन त्याअनुषंगाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या गणेशोत्सवामध्ये व्यापक लोकसहभाग, कल्पकता, नावीन्य, कलात्मकता आणि सामाजिक भान यांचा संगम दिसतो. गणेशोत्सवाच्या प्रथा-परंपरा महाराष्ट्रासह देश-विदेशात विस्तारल्या आहेत. या उत्सवाचे वैश्विक अद्वितीय सांस्कृतिक मूल्य जगासमोर मांडण्यासाठी आवश्यक व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. त्याची पहिली पायरी म्हणून राज्य शासनाने गतवर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला.
राज्य महोत्सवाच्या माध्यमातून राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रवींद्र नाट्य मंदिरात तीन दिवसांचा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला असून ओडिशा, अंदमान-निकोबार आणि दुबई येथेही राज्य महोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री ॲड. शेलार यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर वर्षाकाठी एक हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याचे जतन व संवर्धन करणे आणि त्याला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
‘लोककलेतील श्रीगणेश’ टपाल तिकिटातून सांस्कृतिक वारशाचे जतन
महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांनी सांगितले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणले. सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती आणि स्वातंत्र्यलढ्यातही या उत्सवाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज गणेशोत्सव महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
भारत सरकारचा टपाल विभाग टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशाची कला, संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे जतन व प्रसारण करतो. ‘लोककलेतील श्रीगणेश’ या संकल्पनेवरील ‘कस्टमाइज्ड माय स्टॅम्प’ हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे कायमस्वरूपी जतन करणारे फिलाटेलिक स्मृतिचिन्ह ठरेल, असे जायभाये यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नव्या पिढीमध्ये टपाल तिकिटे आणि फिलाटेलीविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त वारसा यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी सांगितले. त्यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
· गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त आयोजित
· विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रायपूर :- गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव राज्याच्या सीमांपलीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘लोककलेतील श्रीगणेश’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रायपूर येथे संपन्न झाला.
बुधवार, २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मंडळ, जी.ई. रोड, चौबे कॉलनी, रायपूर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे सादरीकरण भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी केले. लोकनृत्य, पारंपरिक कला, संगीत आणि गणेशभक्तीच्या विविध कलाविष्कारांतून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन रसिकांना घडले. कार्यक्रमाला रायपूरमधील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच महाराष्ट्रप्रेमी रसिक उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये गणेशभक्तीला विशेष स्थान आहे. लोककलेच्या विविध माध्यमांतून महाराष्ट्रातील भक्ती, श्रद्धा, लोकजीवन आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. ‘लोककलेतील श्रीगणेश’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती रायपूरमधील रसिकांना घेता आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र मंडळ, रायपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय मधुकर काळे, उपाध्यक्ष गीता श्याम दलाल आणि सचिव चेतन दंडवते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र मंडळ रायपूर गेल्या अनेक दशकांपासून रायपूरमधील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे.
रायपूरचे खासदार अग्रवाल यांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश देत महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेच्या प्रसारासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख राज्याबाहेरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाला रायपूर येथे मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेबद्दलची रसिकांची आत्मीयता अधोरेखित करणारा ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी महाराष्ट्र मंडळ, रायपूरचे पदाधिकारी, कलाकार आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले.
किशोर साहू, मौदा :- उद्या शुक्रवार (ता. 25 सप्टेंबर)ला अनंत चतुर्दशी निमित्त अरोली – कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धानोली सह तालुक्यातील गावा-गावातील विविध गणेश मंडळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
धानोली येथे श्री विनायक बाल गणेश उत्सव मंडळ धानोली व मित्र परिवारातर्फे उद्या शुक्रवार (ता.२५ सप्टेंबर) ला सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणावर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तरी या महाप्रसादाच्या लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
· गणेशोत्सवामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती
मुंबई :- केंद्र शासनाने २०२९ पर्यंत नशामुक्त भारत संकल्प केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रालाही नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमली पदार्थांविषयी जनजागृती महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमातून करण्यात येत आहे.
मुंबई शहरातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. लोकसंवाद उपक्रमाचा भाग म्हणून माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांसमोर भक्तगण, मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांना शासनाच्या योजना, उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली.
या उपक्रमात ‘नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र’, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना, अन्नातील भेसळ प्रतिबंध, पाणी बचत तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा याबाबत जनजागृती करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
गणेश मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
संस्थापक – अध्यक्ष असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या माझगावमधील अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या मंडळाचे सल्लागार सत्यम केसरकर, उपाध्यक्ष दशरथ पवार, कुंडलिक शिंदे, राजाराम कदम, खजिनदार अनिल शिंदे आदींनी नागरिकांना शासनाच्या लोकसंवाद उपक्रमाच्या अनुषंगाने विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष राणे, कार्याध्यक्ष प्रसाद साटम, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक आणि खजिनदार संकेत आढरकर यांनी शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मंडळ सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
लव्हलेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मिहीर मयेकर, उपाध्यक्ष गौरव धुरी आणि कार्याध्यक्ष साहिल मुरुडकर यांनीही ‘लोकसंवाद’ उपक्रमाला सहकार्य केले. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुबोध तोडणकर, उपाध्यक्ष हेमंत मयेकर, मेघा भोईर, उपसचिव मेघा चेंडवणकर यांना महिलांसाठीच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेची माहिती देत पात्र महिलांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. घोडपदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्तू थोरात, सल्लागार विजय शिंदे, जयेंद्र जाधव आदींनीही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
भेसळ आढळल्यास त्वरित माहिती द्या
विभागीय संपर्क अधिकारी किरण वाघ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्नातील भेसळीबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. अन्नामध्ये भेसळ आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन केले.
‘नशामुक्त मुंबई’साठी जनजागृती
विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे यांनी अभियानाविषयी माहिती दिली. तसेच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी अभियानातील सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद आवळे, उपनिरीक्षक सागर घाडगे, उपनिरीक्षक अस्लम मुजावर आणि त्यांच्या पथकाने अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली. मुंबईसह महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी न घाबरता टोल फ्री क्रमांक १९३३ वर आणि जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
विभागीय संपर्क अधिकारी गजानन पाटील यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. सद्यस्थितीत एल निनोमुळे राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने उपलब्ध पाण्याचा जपून आणि योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी योजनांची माहिती
विभागीय संपर्क अधिकारी धोंडिराम अर्जुन आणि इतर मागास बहुजन कल्याण मुंबई शहर कार्यालयाचे विजय तोगरे यांच्या पथकाने इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या असलेल्या शिष्यवृत्ती, वसतिगृह आदी योजनांची माहिती नागरिकांना दिली. पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कौशल्य विकास विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी बेरोजगार युवक-युवतींसाठी राज्यभरात रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईतील १० ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून विविध रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. गरजू युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या योजना, सेवा आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती देणारा ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रम नागरिकांसाठी माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
– ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभतेने मिळणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई :- राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये आणि चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्थापन होत असलेल्या या नवीन कार्यालयांमुळे सामान्य जनतेचा वेळ आणि पैसा वाचणार असून प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यास तसेच महसुली कामांना गती मिळण्यास मदत होईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण, महसुली कामकाजाचा वाढता व्याप तसेच तालुका आणि जिल्हा मुख्यालयांपर्यंतचे भौगोलिक अंतर लक्षात घेऊन प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या कार्यालयांमुळे नागरिकांना विविध दाखले, जमिनीचे फेरफार, संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनांशी संबंधित कामे आणि अन्य महसुली सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत.
प्रशासकीय सुविधा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्हास्तरीय प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार आहे. याचबरोबर राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील ४७ ठिकाणी ही कार्यालये कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधीचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.
महसूल विभागाच्या आदेशानुसार नव्याने स्थापन होणाऱ्या अपर तहसीलदार कार्यालयांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत निश्चित कार्यक्षेत्रासाठी आवश्यक कायदेशीर अधिकार आणि कर्तव्ये प्रदान करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार असून विविध शासकीय कामांसाठी तालुका किंवा जिल्हा मुख्यालयांपर्यंत जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढून नागरिकांना सेवा वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
– ‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत एसएनडीटी विद्यापीठात विशेष महिला रोजगार मेळाव्याचे २९ सप्टेंबर रोजी आयोजन
मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने “पंडीत दिनदयाळ रोजगार महाकुंभ ”या विशेष मोहिमेअंतर्गत दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठात भव्य महिला विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना थेट उद्योग व आस्थापनांशी जोडणे तसेच कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे व ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधी बाबत मार्गदर्शन करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सुनिल पवार, प्रो. हेमलता बागला (अति. कार्य.) आणि कुलगुरू श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ यांचेकडून करण्यात आले आहे.
मुंबई शहर व परिसरातील सेवा व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना या माध्यमातून त्यांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ थेट निवडण्याची मोठी संधी मिळणार आहे. १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक कौशल्य असणारे सर्व पात्र महिला उमेदवार या मेळाव्यात व प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी त्वरित https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन आपली पूर्व-नोंदणी पूर्ण करावी.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण राज्यभर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्याचा अधिकृत तपशील खालीलप्रमाणे आहे.
दिनांक: २९ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ९ वाजेपासून
स्थळ: एसएनडीटी महिला विद्यापीठ परिसर, चर्चगेट
पात्रता: १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमाधारक व सर्व पात्र महिला उमेदवार.
मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि व्यवस्था
Ø ३० स्टॉल्सची उभारणी : मेळाव्यात महिला उमेदवारांच्या सोयीसाठी एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
Ø २०+नामांकित आस्थापनांचा सहभाग : विविध क्षेत्रांतील २० हून अधिक कंपन्या व आस्थापना थेट मुलाखतींद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.
Ø ५ शासकीय महामंडळांचा सहभाग : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ प्रमुख शासकीय महामंडळे या मेळाव्यात सहभागी होत आहेत. ही महामंडळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, विविध शासकीय योजना, कर्ज सुविधा आणि इतर उपक्रमांची थेट माहिती देतील.
Ø कौशल्य विकास प्रशिक्षण : विविध कौशल्य प्रशिक्षण योजना व रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती देणारे विशेष स्टॉल्स येथे उपलब्ध असतील.
Ø जपानमधील रोजगाराच्या संधी : मेळाव्यात उमेदवारांना थेट जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता एक स्टॉल चे नियोजन करण्यात आले आहे. ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुंबई शहर मधील सर्व उद्योजकांनी आणि बेरोजगार महिलांनी या “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ” मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
· शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा केला पुनरुच्चार
· म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची केली पाहणी
वाशिम :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसला (ता. कारंजा) मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक व पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली.
दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पिक पाणी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. वाशिम जिल्ह्यातील म्हसला, (ता.कारंजा) येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तुर पिकाची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मोहगव्हाण (ता. मंगळूरपीर) येथील शेतकरी अनिल भगरे, तसेच अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ते म्हणाले, कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
जऊळका (ता. मालेगाव) येथील शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृष्य परिस्थितीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संतोष यांच्या आई शकुंतला यांनीही दुष्काळी परिस्थितीची कैफीयत मांडली.
या दौऱ्यात परिसरातील पिक व पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला.अत्यल्प पाऊसमानामुळे आसमानी संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांनी कोणतीही चिंता करू नये. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाकडून आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर दिली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक नियोजन करण्यात येईल. त्याच प्रमाणे चारा उपलब्धतेसाठीही दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांना शासनाची मदत थेटपणे मिळण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरु होईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या दौऱ्यात खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सई डहाके आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि शेतकरीबांधव उपस्थित होते.
मुंबई :- दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या कायदेशीर नोटिशीला त्यांच्या वकिलांनी उत्तर दिले आहे. २६ पानी उत्तरामध्ये नोटिशीत करण्यात आलेले आरोप, दावे आणि नुकसानभरपाईची मागणी फेटाळण्यात आली आहे. संबंधित सोशल मीडिया पोस्टमध्ये दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा थेट उल्लेख करण्यात आलेला नसल्याचा दावा उत्तरात करण्यात आला आहे.
सतीश सालियन यांनी १७ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधील कथित विधानांवर आक्षेप घेतला होता. या नोटिशीत माफी मागण्यासह ५०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या वतीने वकील अंशुमन सिन्हा यांनी उत्तर दिले आहे.
पोस्टमध्ये नावाचा उल्लेख नसल्याचा दावा
आदित्य ठाकरे यांच्या उत्तरानुसार, १६ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव कुठेही नमूद केलेले नव्हते. तसेच त्यांच्या दिशेने निर्देश करणारे कोणतेही विशिष्ट वाक्य पोस्टमध्ये नसल्याचेही उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित पोस्टचा थेट संबंध सतीश सालियन यांच्या मानहानीशी जोडता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण कधी भेटलो किंवा ओळखत होतो, हा दावा नाकारला असल्याचेही त्यांच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नोटिशीतील आरोपांच्या आधारे माफी मागण्याची किंवा नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी
दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित आरोपांची अधिकृत आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे. चौकशीच्या माध्यमातून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, अशी भूमिका त्यांच्या उत्तरात मांडण्यात आली आहे. सतीश सालियन यांची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
या कायदेशीर नोटिशीच्या पार्श्वभूमीवर आता सतीश सालियन यांच्या वतीने पुढील कोणती कायदेशीर पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणाशी संबंधित तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.