Home Blog Page 7

प्रत्यक्ष अनुभवातून आरोग्य शिक्षणाची नवी दिशा

0

– जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीच्या विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र कोदामेंढी येथे क्षेत्रभेट दिली

किशोर साहू :मौदा :- पुस्तकातील ज्ञान जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला जोडले जाते, तेव्हा शिक्षण अधिक अर्थपूर्ण होते. या विचाराला अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ज्ञानवर्धक व अनुभवाधारित उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, कोदामेंढी येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.

या क्षेत्रभेटीदरम्यान वैद्यकीय अधिकारी यशश्री पखेडे उपस्थित होत्या. तसेच सुपरवायझर कविता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून दिली.

विद्यार्थ्यांना लहान मुले, गर्भवती माता तसेच वृद्ध रुग्णांसाठी आरोग्य केंद्रामध्ये घेतली जाणारी काळजी, विविध वॉर्ड, औषध भांडार, तात्काळ रुग्णवाहिका सेवा, औषध वितरण कक्ष, लसीकरण कक्ष तसेच इतर विभागांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारत आरोग्य केंद्रातील कार्यपद्धती समजून घेतली.

या वेळी विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आरोग्याच्या चांगल्या सवयी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, स्वच्छता आणि आरोग्याची काळजी याविषयी माहिती मिळवली. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे आरोग्य केंद्र परिसरातील गप्पी माशांची टाकी. गप्पी मासे पाण्यातील डासांच्या अळ्या खाऊन डासांची संख्या कमी करण्यास कशी मदत करतात, याचे महत्त्व कविता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

वैद्यकीय अधिकारी यशश्री पखेडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आरोग्याची काळजी, संतुलित आहाराचे महत्त्व, डोळ्यांची निगा आणि वैयक्तिक स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच रक्त तपासणी कक्षातील दीपक कटोके यांनी विद्यार्थ्यांना रक्त तपासणीची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. याशिवाय रुग्णालयातील वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट तसेच मुदत संपलेल्या औषधांची सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट कशी लावली जाते, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

या संपूर्ण क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने निरीक्षण केले, प्रश्न विचारले आणि प्रत्यक्ष अनुभवातून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण ज्ञान आत्मसात केले. त्यामुळे ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध आणि संस्मरणीय ठरली.

हा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सहशिक्षक निलेश जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी व संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित केले.क्षेत्रभेट म्हणजे केवळ शाळेबाहेर जाणे नव्हे; तर प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान, जिज्ञासा आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्याची एक प्रभावी शैक्षणिक प्रक्रिया आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य विकसित होण्यास मदत झाली.

भंडारा पोलिसांचा खाक्या: मोहाडीतील ३ सराईतांना ठोकली तडीपारी; चालू वर्षात तब्बल ३७ गुन्हेगार हद्दपार!

0

हंसराज, भंडारा मोहाडी :- जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळू तस्करी आणि अमली पदार्थांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी भंडारा जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोहाडी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दोन सराईत रेती तस्कर आणि एका बेकायदेशीर दारू व अमली पदार्थ विक्रेत्याला भंडारा जिल्ह्याच्या सीमाभागातून १ महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी तुमसर यांनी हे आदेश जारी केले असून, या कारवाईमुळे चालू वर्षात जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची एकूण संख्या आता ३७ वर पोहोचली आहे.

मोहाडी परिसरात सातत्याने बेकायदेशीर कारवाया करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या समाजकंटकांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहाडी पोलीस ठाण्याचे ठाणेप्रभारी अधिकारी यांनी गुन्हेगारी अभिलेख तपासून तडीपारीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तुमसर येथे कायदेशीर मंजुरीसाठी सादर करण्यात आला.

सादर प्रस्तावाची सखोल पडताळणी करून, सराईत गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी (तुमसर) गणेश दिघे यांनी तिन्ही गुन्हेगारांना दिनांक २२ सप्टेंबर २०२६ पासून १ महिन्याकरिता भंडारा जिल्ह्याच्या स्थलसीमेतून तडीपार करण्याचे आदेश पारित केले. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अवैध रेती तस्कर राहुल गजानन बांडेबुचे (वय २५ वर्षे, रा. रोहा, ता. मोहाडी), प्रदिप उर्फ बबलु राधेश्याम बांडेबुचे (वय २८ वर्षे, रा. रोहा, ता. मोहाडी) तसेच दारू विक्री व अमली पदार्थ बाळगणारा , रुपेश नथ्थु सोनकुसरे (वय ३५ वर्षे, रा. टिळक वार्ड मोहाडी, ता. मोहाडी) यांचा समावेश आहे.

सदर धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, मोहाडी पोलीस ठाण्याचे ठाणेप्रभारी अधिकारी बेलखेडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मोपेडवरून गांजाची तस्करी करणारे जाळ्यात, दीड लाखांच्या मुद्देमालासह तिघांवर गुन्हा दाखल!

0

हंसराज,भंडारा/तुमसर :- जिल्ह्यात अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात भंडारा जिल्हा पोलीस दलाने जोरदार मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा मेहगाव शिवारात सापळा रचून धाडसी कारवाई करत बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २ किलो निव्वळ गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गंगवानी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा मेहगाव येथे संशयित इसम अमली पदार्थांची वाहतूक करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून हिरवट-काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या व बिया असलेला सुका गांजा (एकूण वजन २.१२० कि.ग्रॅ., प्लास्टिक पिशवी वगळता निव्वळ २.०० कि.ग्रॅ. गांजा, अंदाजे किंमत रु. ४०,०००/-) मिळून आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी गांजा वाहतुकीसाठी वापरलेली निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड (क्रमांक: MH 36 AQ 8713, किंमत रु. ८०,०००/-) आणि आरोपीकडील एक वनप्लस (Oneplus) कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (किंमत रु. ३०,०००/-) असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल सुरेश गजभिये (वय ३५ वर्षे, रा. आंबागड, ता. तुमसर, जि. भंडारा) आणि विलास झीबल मडावी (वय ३६ वर्षे, रा. हरदोली/आंबागड, ता. तुमसर, जि. भंडारा) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी हा गांजा आरोपी पिंटु उर्फ प्रशांत निखाडे (रा. तुमसर) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यावरून तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २० (ब) ii (ब), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ (NDPS Act 1985) अन्वये अप. क्र. १००६/२०२६ नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सदर यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गंगवानी, पोलीस अंमलदार गाढवे, डोयले, मते, बेदुरकर, साकुरे, मलधाम व साठवणे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

गहू बंद करून मका लादणे थांबवा; भंडारा जिल्ह्यात गव्हाचे वाटप तात्काळ सुरू करा!

0

– शासनाचा साठा खपवण्यासाठी जनतेच्या आहारावर गदा नको : माजी आमदार चरण वाघमारे यांचा इशारा

हंसराज,भंडारा :- शासकीय गोदामातील मक्याचा साठा खपवण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचा हक्काचा गहू बंद करून त्यांच्यावर मका लादण्याचा प्रकार अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सुरू आहे. हा सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आहारावर आणि हक्कांवर झालेला मोठा अन्याय आहे. त्यामुळे मका लादणे त्वरित थांबवून जिल्ह्यात गव्हाचे वाटप पूर्ववत सुरू करावे, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील रास्त भाव (रेशन) दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाऐवजी केवळ मका वितरित केला जात असल्याच्या तीव्र तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार चरण वाघमारे यांनी पुरवठा विभागाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.

मक्याचा साठा खपवण्यासाठी जनतेचा बळी नको!

यासंदर्भात बोलताना चरण वाघमारे म्हणाले की, “भंडारा जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबांच्या रोजच्या आहारात गव्हाच्या पोळ्यांचा समावेश असतो. लोकांची मागणी नसताना केवळ शासनाकडे मक्याचा साठा शिल्लक आहे किंवा मक्याची खरेदी झाली आहे म्हणून तो शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारणे चुकीचे आहे. शासनाचा साठा खपवण्यासाठी नागरिकांच्या आहाराच्या सवयी आणि गरजा बदलता येणार नाहीत. शासनाला मका द्यायचाच असेल, तर गव्हाला पर्याय म्हणून न देता गव्हासोबत अतिरिक्त मका द्यावा; परंतु गहू पूर्णपणे बंद करणे अन्यायकारक आहे.”

गेल्या ३ महिन्यांत किती गहू आला? श्वेतपत्रिका काढा!

शासनाच्या अधिकृत ‘PDS’ (सार्वजनिक वितरण प्रणाली) पोर्टलवर संपूर्ण राज्यभरात गहू वितरणाची नोंद दिसत आहे. मग असे असताना भंडारा जिल्ह्यातच गव्हाचा तुटवडा का भासत आहे? गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यासाठी प्रत्यक्ष किती गहू मंजूर झाला आणि त्यापैकी किती गहू वितरित करण्यात आला, याची पारदर्शक माहिती शासनाने व जिल्हा पुरवठा विभागाने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत हजारो कुटुंबे रेशनवर अवलंबून आहेत. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबांचे मोठे हाल होत आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, भंडारा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकांना त्वरित नियमित गव्हाचा पुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही चरण वाघमारे यांनी दिला आहे.

आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी करा; बसपा भंडारातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

हंसराज,भंडारा :- मुंबई येथील नामांकित भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Bombay) मधील विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या झालेल्या दुर्दैवी आणि संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी (बसपा) भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून दलित व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. साहिलला कॅम्पसमध्ये सातत्याने जातीय स्वरूपाची अपमानास्पद वागणूक, मानसिक त्रास व छळाला सामोरे जावे लागत होते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आले आहे. या संपूर्ण तपासावर कोणताही बाह्य दबाव किंवा संस्थात्मक प्रभाव पडू न देता सर्व संबंधित व्यक्ती, अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची चौकशी व्हावी; तसेच परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, संदेश, ई-मेल, डिजिटल पुरावे व आधीच्या तक्रारींची निष्पक्ष तपासणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

साहिल हा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थी होता. वंचित, दुर्बल व मागास घटकांतील विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळणे ही सामाजिक प्रगतीची महत्त्वाची पायरी आहे. मात्र, प्रवेश मिळाल्यानंतर तिथे त्यांना समानता, सन्मान आणि भेदभावमुक्त सुरक्षित वातावरण मिळणे तितकेच गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची जात, आर्थिक परिस्थिती किंवा आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेला प्रवेश यावरून त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचवणे संविधानाच्या मूल्यांशी प्रतारणा करणारे आहे. जातीय भेदभाव, अपमान, सामाजिक बहिष्कार आणि मानसिक छळाला कोणत्याही शैक्षणिक संस्थेत थारा असू नये, अशी ठाम भूमिका बसपाने मांडली.

साहिल वाकोडे याच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य जनतेसमोर यावे, निष्पक्ष तपासातून दोषींची भूमिका निश्चित होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याला अशा छळाला सामोरे जावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा बसपाने व्यक्त केली आहे.

या प्रसंगी बसपाचे विधानसभा अध्यक्ष नाशिक चवरे, भंडारा लोकसभा प्रभारी संजय भिवगडे, ज्येष्ठ नेते तुळशीराम शेंडे, के. एल. गजभिये, रवी गजभिये, रणजीत नंदागवळी, त्र्यंबक घरडे, भारत खोब्रागडे, सिद्धार्थ शेंडे, बाबुराव मेश्राम, संजय रामटेके, सुरेंद्र उके, साहिल हुमणे, उल्हास बनसोड यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रमुख मागण्या

• साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.

• कुटुंबीयांनी केलेल्या जातीय भेदभावाच्या व मानसिक छळाच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी.

• प्रकरणाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज व डिजिटल पुरावे तातडीने सुरक्षित करावेत.

• सर्व संबंधित प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जावेत.

• दोष सिद्ध झाल्यास संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

• या तपासाचा संपूर्ण अहवाल पारदर्शकपणे जनतेसमोर जाहीर करण्यात यावा.

लाखनीच्या वाघाये महाविद्यालयात सामाजिक संदेशासह गणेशोत्सव उत्साहात संपन्न

0

– विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक नियोजन; भजन व विविध स्पर्धांनी परिसर भक्तिमय

हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही  श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करून दहा दिवसीय गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या संपूर्ण उत्सवाचे नियोजन, पूजा, सजावट आणि विसर्जन व्यवस्थापनाची संपूर्ण धुरा विद्यार्थ्यांनी स्वतःहून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळली.

केवळ पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा न करता, विद्यार्थ्यांनी या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले. समाजप्रबोधनात्मक पथनाट्ये, पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) देखावे आणि मूर्तिकला यामुळे महाविद्यालयातील देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात पुष्पहार स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या ढोल-ताशा पथकाने उत्सवात विशेष रंग भरला.

उत्सवादरम्यान महाविद्यालयात ‘भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने आणि टाळ-मृदुंगाच्या गजराने संपूर्ण महाविद्यालयीन परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या दहा दिवसीय उत्सवाची सांगता २४/०९/२०२६ झाली ,लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली . विसर्जनानंतर महाविद्यालयात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

हा उत्सव संस्था अध्यक्ष सरोज सेवक वाघाये यांच्या प्रेरणेने व कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.

स्व.निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस’ उत्साहात संपन्न

0

– ‘एन.एस.एस.’ तरुणांना योग्य दिशा देणारे प्रभावी माध्यम : डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांचे प्रतिपादन

हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय, लाखनी येथे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) स्थापना दिवस अत्यंत उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. पुण्यशील टेंभुर्णे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. स्वप्निल गाढवे आणि प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मुनेश्वर हलमारे उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा. स्वप्निल गाढवे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “२४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेची अधिकृत सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी २४ सप्टेंबर हा दिवस ‘एन.एस.एस. दिवस’ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि निस्वार्थ सेवाभाव रुजवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी’ (Not Me, But You – स्वयं से पहिले आप) हे या योजनेचे ब्रीदवाक्य मानवी मूल्यांची शिकवण देते.”

प्रमुख अतिथी प्रा. मुनेश्वर हलमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “एन.एस.एस.च्या माध्यमातून राबविली जाणारी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान, रस्ते सुरक्षा जनजागृती आणि ग्रामीण भागातील विशेष श्रमसंस्कार शिबिरे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडतात. या सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांमधील संवादकौशल्य व आत्मविश्वास वाढीस लागतो आणि ते एक जबाबदार नागरिक म्हणून घडतात.”

अध्यक्षीय भाषणात डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “तरुण पिढी हे देशाचे भविष्य असून एन.एस.एस. हे त्यांना समाजविकासाच्या प्रवाहात योग्य दिशा देणारे एक सक्षम माध्यम आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधचिन्ह ओडिशा येथील ऐतिहासिक कोणार्क सूर्यमंदिराच्या रथचक्रावर आधारित असून, ते अविरत गती, प्रगती आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे.”

कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट सूत्रसंचालन बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी  सीमा ठाकरे हिने केले, तर उपस्थितांचे आभार सीमा चोपकर हिने मानले. या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरोली – कोदामेंढी जि. प.सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश उत्सव मंडळाला मौदा तालुक्यातील भाजपा व भाजयूमो पदाधिकाऱ्यांच्या भेटी

0

किशोर साहू :मौदा:- अरोली – कोदामेंढी जि. प.सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश उत्सव मंडळाला मौदा तालुक्यातील भाजपा व भाजयूमो पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन, मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उत्साह वाढविला.

याप्रसंगी भगवान बावनकुळे अध्यक्ष भाजपा मौदा तालुका, नरेश बावानकुळे सदस्य समन्वय समिती मौदा , चंद्रशेखर जाधव अध्यक्ष भाजपा अ.जा. मौदा तालुका, गोपाल गिरमेकर  उपसरपंच कोदामेंढी ,अमोल नरोले सरपंच धानोली,विनोद गभने सरपंच तांडा ,दर्शना बागड़े सरपंच तोडली, रामपाल धांडे उपसरपंच तोडली , विनोद कारेमोरे माजी सरपंच सिरसोली ,गंगाधर डोरले अध्यक्ष तंटामुक्त समिती तांडा, कैलाश खराबे,शंकर भूरे, कोमल मेहर , मनोज वाणी, शंकर चाफले,विष्णु भूते, आनंदराव बांते, निखिल बडवाईक, प्रणय भुतांगे व गणेश मंडळचे सपूर्ण पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

येसंबा येथे मारोती देवस्थान पंचकमेटी येसंबा साकारतेय 51 फुटी भव्य हनुमान मंदिराचा कळस

0

– येसंबा हे मौदा तालुक्यातील एकमेव 51 फुटी कळस असलेले देवस्थान ठरणार; भाविकांमध्ये उत्साह

किशोर साहू,मौदा :- चाचेर-निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या येसंबा येथील श्री हनुमान मंदिराच्या कळसाचे भव्य बांधकाम सुरू असून, तब्बल 51 फूट उंचीचा कळस साकारला जात आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील विशेष कारागीर या कळसाचे बांधकाम करीत आहे. मौदा तालुक्यात अशा प्रकारचा 51 फुटी कळस असलेले येसंबा हे एकमेव देवस्थान ठरणार असल्याने परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री हनुमान मंदिर परिसराच्या विकासाच्या दृष्टीने हा कळस विशेष आकर्षण ठरणार आहे. मंदिराची धार्मिक व आध्यात्मिक परंपरा जपत ग्रामस्थ, भाविक आणि देणगीदारांच्या सहकार्याने कळसाचे बांधकाम करण्यात येत आहे. भव्य कळसामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून, येसंबा गावाच्या धार्मिक पर्यटनाला देखील चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भव्य कळसाच्या बांधकामासाठी ग्रामस्थ व भाविकांचे सहकार्य लाभत असून, मंदिर विकासासाठी पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.श्री हनुमान मंदिराच्या 51 फुटी कळसामुळे येसंबा गावाच्या धार्मिक वैभवात मानाचा तुरा रोवला जाणार आहे, असे देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी व सध्या बांधकामावर विशेष देखरेख ठेवणाऱ्या पोलीस पाटील नरेंद्र राऊत यांनी सांगितले.

विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2027 के लिए नागपुर के युवाओं से सहभागिता का आह्वान

0

– 15 से 29 वर्ष आयु वर्ग के युवाओं को ‘माय भारत’ पोर्टल पर पंजीयन का अवसर; जिला, राज्य एवं राष्ट्रीय स्तर पर होगा चयन

नागपुर :- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार की ओर से स्वामी विवेकानंद जयंती के अवसर पर आयोजित किए जाने वाले ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) 2027’ की रूपरेखा घोषित कर दी गई है। राष्ट्रीय युवा महोत्सव के अंतर्गत 10 से 12 जनवरी 2027 तक नई दिल्ली में इस कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। देश के युवाओं को ‘विकसित भारत @2047’ की संकल्पना से जोड़ने तथा उनके विचारों को नीति-निर्माण प्रक्रिया में शामिल करने के उद्देश्य से यह पहल की जा रही है। इस कार्यक्रम में 15 से 29 वर्ष आयु वर्ग के युवा सहभागी हो सकते हैं। युवाओं को ‘माय भारत’ पोर्टल (mybharat.gov.in) पर ऑनलाइन पंजीयन कर चयन प्रक्रिया में शामिल होने का अवसर मिलेगा। इसके अंतर्गत ऑनलाइन पंजीयन के साथ निबंध प्रतियोगिता भी आयोजित की जाएगी। इस वर्ष VBYLD में विकसित भारत चैलेंज, कल्चरल ट्रैक, डिजाइन फॉर भारत, हैक फॉर सोशल गुड, यूथ एंटरप्रेन्योर्स चैलेंज और यूथ पार्लियामेंट जैसे विभिन्न ट्रैक शामिल किए गए हैं। इसके अलावा यूथ पार्लियामेंट को VBYLD के साथ एकीकृत किया गया है। ‘विकसित भारत चैलेंज’ के अंतर्गत देश को 10 प्रादेशिक क्लस्टर्स में विभाजित किया गया है। इन क्लस्टर्स के माध्यम से युवाओं को विभिन्न राज्यों की विशेषताओं और आवश्यकताओं के अनुरूप अभिनव समाधान विकसित करने का अवसर मिलेगा। प्रतिभागियों का चयन पारदर्शी प्रक्रिया के माध्यम से जिला, राज्य और राष्ट्रीय, इन तीन स्तरों पर किया जाएगा। इस अभियान में माय भारत के माध्यम से राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय कैडेट कोर (NCC), खेल क्षेत्र से जुड़े विद्यार्थी एवं खिलाड़ी तथा माय भारत के स्वयंसेवक बड़ी संख्या में सहभागी होंगे। नागपुर जिले के अधिक से अधिक युवाओं ने इस राष्ट्रीय स्तर के अभियान में सहभागी होकर अपनी प्रतिभा, विचार एवं नवाचार को मंच प्रदान करना चाहिए, ऐसा आह्वान माय भारत, नागपुर के उपनिदेशक सौरभ कुमार निषाद ने किया। इस अवसर पर रमेश अहिरकर भी उपस्थित थे।