spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माता-बालमृत्यू रोखण्यासाठी SOP तयार करा; जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देश

हंसराज,भंडारा :- माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सजगतेने, संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे. माता-बालमृत्यू रोखण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून त्यानुसार नियोजनबद्ध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासकीय रुग्णालयांतील प्रसूती कक्षाकडे विशेष लक्ष देऊन गर्भवती माता व नवजात बालकांना वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात माता व बालमृत्यू प्रतिबंधाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिषा साकोडे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

माता व बालमृत्यूच्या प्रत्येक घटनेचे गांभीर्याने विश्लेषण करून मृत्यूची नेमकी कारणे शोधावीत. त्यानुसार भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी, उच्च जोखमीच्या गर्भवतींची विशेष देखरेख आणि प्रसूतीदरम्यान आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रसूतीनंतर माता व नवजात बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करून माता-बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Popular Articles