मुदतीच्या आत प्रभाग निहाय यादी तयार करा – आयुक्त डॉ. चौधरी

0
66

– मतदार यादी तयार करण्याच्या प्रशिक्षणात मनपा आयुक्तांनी केले मार्गदर्शन

नागपूर :- राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीच्या आत प्रभाग निहाय विभाजनासाठीच्या यादी तयार करण्यात याव्यात. असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी शनिवारी दिले.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या मतदार यादीच्या प्रभाग निहाय विभाजना बद्दल मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात शनिवारी (ता.१८) प्रशिक्षण पार पडले. यावेळी आयुक्तांनी आयुक्त उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजया बनकर, उपायुक्त मिलींद मेश्राम, अशोक गराटे, गणेश राठोड, सहायक आयुक्त श्याम कापसे, राजकुमार मेश्राम, विजय थूल, नरेंद्र बावनकर, धनंजय जाधव, विकास रायबोले, हरिष राऊत, प्रमोद वानखेडे, नोडल अधिकारी सुनिल उईके यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम २०२५ जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अधिसूचित केलेल्या तारखेस (१ जुलै २०२५) अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारुप मतदार यादी येत्या ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल व यावर हरकती, सूचना मागविण्यात येईल. येत्या ४ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर येत्या १० डिसेंबर २०२५ ला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

त्याअनुषंगाने मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजनाबद्दल मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त निवडणुकीशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीच्या आत लवकरात लवकर प्रभाग निहाय विभाजनासाठीच्या यादी तयार करण्यात याव्यात,यादी तयार करताना अधिकारी समन्वयाने कार्य करावे, आवश्यक नियोजन करून यादी तयार करण्यासाठी कामे करावीत. त्याकरिता सातत्याने आढावा घ्यावा. तसेच कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडून शंकाचे निराकरण करून घ्यावे. एका झोनमधील मतदारांचे नाव दुसऱ्या झोन मध्ये जात असेल तर इतर झोनमधील निवडणुकीशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवावा. आवश्यकता पडल्यास केंद्रीय चमूची मदत घ्यावी. पूर्ण जबाबदारीने आणि गंभीरतेने मतदार यादी तयार करण्यासाठी कामे करावीत. निवडणुकीचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. याचबरोबर कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा ईशारा त्यांनी प्रशिक्षणादरम्यान दिला.

यावेळी नोडल अधिकारी यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची रूपरेषा मांडली. अतिरिक्त आयुक्त विजया बनकर यांनी सुद्धा अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.