नागपूर :- रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता, सुरक्षितता व कायदेशीर जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय रियल इस्टेट सल्लागार एजंट वेलफेअर युनियन (भारत) यांच्या वतीने अकोला जिल्ह्यात “रियल इस्टेट लिगल अवेअरनेस व संवाद कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कृषक भवन, मूर्तिजापूर मार्ग, स्टेडियमजवळ, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रियल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक, सल्लागार, एजंट, बिल्डर व डेव्हलपर यांना मालमत्तेशी संबंधित कायदेशीर तरतुदी, दस्तऐवजीकरण प्रक्रिया तसेच सुरक्षित व्यवहार याबाबत जागरूक करणे हा असून, यामुळे रियल इस्टेट क्षेत्र अधिक सुरक्षित, संघटित व पारदर्शक होण्यास मदत होईल. कार्यक्रमात रियल इस्टेट क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव, कायदेशीर वाद टाळण्याचे उपाय, नोंदणी प्रक्रिया तसेच गुंतवणूक सुरक्षितता यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रियल इस्टेट सल्लागार व एजंट यांची भूमिका, सुरक्षितता आणि त्यांचे हक्क यावरही विशेष चर्चा होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३ वाजता होणार असून, उद्घाटन समारंभाला आमदार अकोला रणधीर सावरकर (मुख्य अतिथी) म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापौर अकोला शारदा खेळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) वर्षा मीना (सन्माननीय अतिथी) म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच नारेडको (NAREDCO) अध्यक्ष सुनील इंदानी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ७ वाजता. होणार असून समारोप समारंभाला खासदार अकोला अनुपजी धोत्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक (अतिथी) आणि मनपा आयुक्त अकोला डॉ. सुनील लहाने (अतिथी) म्हणून उपस्थित राहणार आहेत. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रियल इस्टेट हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे क्षेत्र असून, कायदेशीर माहितीअभावी अनेकदा वाद व फसवणुकीचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत या प्रकारचे जनजागृती व संवाद कार्यक्रम रियल इस्टेट क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता व संघटनात्मक बळकटी निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार आहेत. युनियनच्या वतीने अकोला जिल्ह्यातील सर्व रियल इस्टेट व्यावसायिक, सल्लागार,एजंट तसेच संबंधित नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








