spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलीस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणुक

– खंडाळा शिवारात १ लाख ५० हजार रुपयाचे दागिने लंपास

कन्हान :- पोलीस असल्याचा बनाव रचत तिन अनोळखी इसमांनी ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा खंडाळा शिवारात घडली. आयुष्यभर कष्ट करून जमवलेली कमाई काही क्षणांत हिरावुन गेल्याने संबंधित ज्येष्ठ नागरिक हादरून गेले असुन परिसरात संताप व्यकत करित भीतीचे वातावरण पसरले आहे.

इंदिरा नगर, पाण्याची टाकी जवळ कन्हान येथे राहणारे परसराम संपत वैरागडे वय ६४ वर्ष हे वेकोलि सावनेर येथुन सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. निवृत्तीनंतर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या परसराम यांच्यावर अचानक ओढावलेल्या या घटनेने त्यांचे कुटुंबही सुन्न झाले आहे. सोमवार (दि.९) फेब्रुवारी २०२६ ला सकाळी ११.३० वाजता परसराम वैरागडे हे आपल्या मोटारसायकलने बोरी शिंगोरीकडे निघाले होते. सकाळी ११.४५ ते १२ वाजता सुमारास मौजा खंडाळा शिवारात रोडवर एका अनोळखी इस माने त्यांना अडविले. “आम्ही पोलीस आहोत, तुम्ही थांबला नाही,” असे सांगत त्याने विश्वास निर्माण केला . काही क्षणांतच आणखी दोन अनोळखी इसम तेथे आले. “वरून आदेश आहेत, दागिने घालुन जाऊ नका ,” असे सांगत तिघांनी परसराम यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे (२० ग्रॅम) जुने वापरते सोन्याचे गोप आणि पाच ग्रॅमची अंगठी काढुन घेतली. एकुण १ लाख ५० हजार रुपयांचे दागिने एका कागदात गुंडाळुन रुमालात ठेवुन दिल्याचे भासवुन तिघेही नागपुरच्या दिशेने पसार झाले. काही वेळाने रुमाल उघडुन पाहताच त्यात खरे दागिने नसुन बनावट पिवळ्या रंगाची अंग ठी आढळली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच परसराम वैरागडे यांचे हात थरथर कापु लागले. त्यांनी तात्काळ घरी जाऊन मुलाला घडलेला प्रकार सांगितला आणि कन्हान पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा आरोपीं विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

पोलीस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नाग रिकांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, कुणीही ओळखपत्रा शिवाय पोलिस असल्याचे सांगितल्यास थेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कन्हान पोलिसांनी केले आहे.

Popular Articles