– दोघांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
– मद्यप्राशन करवून सोन्याची साखळीही हिसकावली; मैत्रिणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई :- पार्टीला जाण्याचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावण्यात आले. त्यानंतर तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करण्यास भाग पाडून दोघांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार मिरा रोड परिसरात उघडकीस आला आहे. याचवेळी आरोपींनी मुलीच्या गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीही काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रिणीच्या निमंत्रणावरून पार्टीला गेली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला तिच्या एका महिला मैत्रिणीने पार्टीच्या निमित्ताने मिरा रोड येथे बोलावले होते. तेथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारादरम्यान तिच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीही काढून घेण्यात आली.
घरी न परतल्याने प्रकार उघडकीस
रात्र होऊनही मुलगी घरी परतली नाही, त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती समोर आली. कुटुंबीयांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या महिला मैत्रिणीसह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मिरा रोड परिसरात खळबळ उडाली आहे.






