spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूरमध्ये लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश

– मनपाच्या आरोग्य विभागाची मोठी कारवाई

– स्टिंग ऑपरेशनद्वारे केला मोठा खुलासा

नागपूर :- बेकायदा गर्भलिंगनिदान करणे हा गंभीर गुन्हा असतानाही शहरात छुप्या पद्धतीने चुकीची प्रॅक्टिस करणाऱ्या दोन डॉक्टरांवर नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने ‘गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चाचणी’ (PCPNDT) कायद्यान्वये मोठी कारवाई केली आहे. नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाने अशा प्रकारची पहिल्यादांच इतकी मोठी कारवाई केली आहे.

मनपाच्या आरोग्य विभागाला बेकायदा लिंगनिदानाबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करण्याची योजना आखली. यानुसार, वर्धमान नगर येथील डॉ. रेखा शिरसाट (बीएएमएस) यांच्या शिवम हॉस्पिटलमध्ये एका ‘डमी’ महिला पेशंटला पाठवण्यात आले.

डमी पेशंटने डॉ. शिरसाट यांच्याकडे गर्भातील बाळाचे लिंगनिदान करण्याची विचारणा केली. प्रथमतः त्यांनी नकार दिला, परंतु नंतर या चाचणीसाठी तब्बल ६० हजार रुपयांची मागणी केली. “पैसे द्या, गर्भात मुलगा आहे की मुलगी, आम्ही सांगतो,” असे त्यांनी पेशंटला सांगितले. महिला पेशंटने पुन्हा डॉक्टरांची भेट घेतली आणि चाचणीसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर डॉक्टरांनी पेशंटला दुसरीकडे सोनोग्राफीसाठी पाठवले जाईल, असे सांगितले. स्टिंग ऑपरेशनच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी, महिला पेशंटने शिवम हॉस्पिटलमध्ये हजेरी लावली आणि तेथे प्रथम ५० हजार रुपये जमा केले. यानंतर एका एजंटने महिला पेशंटला बाईकवर बसवून आठ ते दहा किलोमीटर दूर असलेल्या सदर परिसरात आणले. पहिल्या दिवशी चाचणी न झाल्याने पैसे परत करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी, शनिवारी, एजंटने पुन्हा महिला पेशंटला बाईकवर बसवून सदर येथील सराफा चेंबरमधील डॉ. राजीव नागी यांच्या सोनोग्राफी सेंटरवर नेले. लिफ्ट बंद असल्यामुळे पेशंटला तीन मजले पायी चालत क्लिनिकपर्यंत जावे लागले. येथे डॉ. नागी यांनी महिला पेशंटला गर्भातील बाळाचे लिंग तपासून सांगितले. यानंतर एजंटने पेशंटला पुन्हा बाईकवरून शिवम हॉस्पिटलमध्ये आणले.

सोनोग्राफी सेंटर सील

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर, मनपाच्या पथकाने तातडीने पोलिसांना सोबत घेऊन डॉ. नागी यांच्या क्लिनिकवर धाव घेतली. मात्र, क्लिनिक बंद आढळले. डॉ. नागी यांना फोनद्वारे संपर्क साधला असता ते ‘आऊट ऑफ स्टेशन’ असल्याचे कळले. यानंतर मनपाच्या चमूने पोलिसांच्या मदतीने तत्काळ सोनोग्राफी सेंटर सील केले. स्टिंग ऑपरेशनसाठी मनपाच्या पथकाने रेकॉर्डिंगची काळजीपूर्वक तयारी केली होती.

मनपा आयुक्तांकडून कौतुक

मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आणि डॉ. सरला लाड यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण यशस्वी कारवाई पार पडली. या कारवाईनंतर मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी संपूर्ण चमूचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.

कारवाईत सहभागी मनपाच्या चमूमध्ये सहाय्यक आयुक्त विजय थूल, प्रदीप, दिपाली नागरे, सिव्हिल सर्जन कार्यालयाचे एड.भिसे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक खान, डॉ. ख्वाजा, सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या रूपाली यांच्यासह मनपाचे कर्मचारी व चिंटू बोरकर, सिद्धेश ठमके आदी सहभागी होते. सदर पोलीस स्टेशन आणि नंदनवन पोलीस स्टेशन मार्फत तपास व पुढील कारवाई सुरू आहे.

Popular Articles