spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनरेगा अंतर्गत कुशल व अकुशल कामांच्या देयकांच्या वितरणासाठी ‘स्पर्श’ प्रणाली लागू; प्रलंबित रक्कम लवकरच वितरित होणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई :- मनरेगा अंतर्गत कुशल व अकुशल कामांच्या देयकांच्या वितरण प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘स्पर्श’ ही नवीन संगणकीय प्रणाली लागू करण्यात आली असून, लवकरच सर्व प्रलंबित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

आमदार नारायण कुचे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मनरेगा संदर्भात प्रश्नोत्तरांच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मनरेगामधील लाभार्थ्यांना २८०० कोटी रूपयांचे देणे प्रलंबित होते. ही रक्कम वितरित करण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या हिश्श्याचा समन्वय आवश्यक असून, नव्या ‘स्पर्श’ प्रणालीद्वारे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे.

केंद्राचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर राज्याचा हिस्सा ‘एफटीओ सायबर ट्रेझरी’मध्ये जमा केला जातो आणि त्यानंतर दोन्ही हिस्से एकत्र करून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. ही प्रणाली लागू होऊन अवघे चार महिने झाले असल्याने सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र पुढील एका महिन्यात सर्व प्रक्रिया सुरळीत होऊन निधी वितरणाला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रश्नावरील चर्चेत विधानसभा सदस्य डॉ. नितीन राऊत, नाना पटोले, प्रकाश सोळंके,भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला.

Popular Articles