spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वैनगंगा पुलावरील पथदिवे बंद, खड्डे वाढले

– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; दुरुस्तीची मागणी

हंसराज, भंडारा :- भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील पुलावरील पथदिवे गेल्या काही महिन्यांपासून बंद असून पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे पथदिवे तातडीने सुरू करावेत आणि खड्डे बुजवावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनातील माहितीनुसार, सुमारे २० वर्षांपूर्वी अशोका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने हा पूल बांधला. तो राष्ट्रीय महामार्गावर येत असून भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या पुलावरून पूर्वी रात्रंदिवस जड वाहनांची वर्दळ असायची, ती कमी प्रमाणात का होईना आजही सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक काही महिन्यांपासून शहराबाहेरून वळवण्यात आली आहे. मात्र आसपासच्या खेड्यांतील हजारो नागरिक कामानिमित्त रोज शहरात येतात. काम आटोपून घरी परतताना पुलावर अंधार असल्याने सायकलस्वार आणि पायी चालणाऱ्यांना अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पुलाच्या मध्यभागी एका ठिकाणी जॉईंट उघडे पडल्याचेही निवेदनात नमूद आहे.

निवेदनानुसार, अशोका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी टोल आकारत असताना पुलाची देखभाल व्यवस्थित होत होती, मात्र टोल बंद झाल्यानंतर समस्या वाढल्या आहेत.

पथदिवे तातडीने सुरू करून खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, हिमांशू भाजीपाले, नितेश गभणे, अथर्व समर्थ, राज वधवानी, शामराव मालखंडाळे, संतोष चांदेवार, अतुल मिरासे आदी पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला. निवेदनाची प्रत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनाही देण्यात आली आहे.

Popular Articles