spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खत – बियाण्याच्या पुरेसा साठा उपलब्ध : तक्रारीसाठी हेल्पलाइन जारी 

हंसराज भंडारा :- भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 ला सुरुवात झाली असली तरी मान्सूनला अपेक्षित वेग न मिळाल्याने पेरणीची कामे काही प्रमाणात खोळंबली आहेत. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केले आहे.

भंडारा जिल्ह्यात विविध पिकांखाली सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र असून त्यामध्ये भात हे प्रमुख पीक आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले असून सुमारे 45 हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार महाबीज तसेच विविध खाजगी कंपन्यांचे बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील 406 बियाणे नमुने तपासणीसाठी घेतले असून ते नागपूर येथील बियाणे चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच जिल्हा भरारी पथकाद्वारे कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची नियमित तपासणी सुरू आहे.

खते, बियाणे किंवा कीटकनाशकांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कृषी निविष्ठांबाबत कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी 9423028372 या क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खतांच्या उपलब्धतेबाबतही कृषी विभागाने नियोजन केले आहे. सध्या जिल्ह्यात 12 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध असून 26 हजार मेट्रिक टन इतर खतांचा साठा उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने रोवणीच्या काळात खतांची मागणी वाढते. विशेषतः जुलै महिन्यात खतांची आवश्यकता अधिक असते. याची दखल घेऊन येत्या दोन महिन्यांत आणखी पुरेसा खतसाठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच 2,700 मेट्रिक टन युरिया खताचा बफर साठा तयार ठेवण्यात आला आहे.

युद्धजन्य परिस्थितीचा पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊनही खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी आणि घाईगडबडीत निर्णय घेऊ नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी खत, बियाणे व इतर कृषी निविष्ठांचे आवश्यक नियोजन पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले.

Popular Articles