हंसराज, भंडारा :- शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’च्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी तरुण सामाजिक कार्यकर्ते सुरज निंबार्ते यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या संघटनेच्या विदर्भ आढावा बैठकीत ही अधिकृत घोषणा करण्यात आली
अमरावती येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आक्रमक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या आदेशानुसार सुरज निंबार्ते यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतः सुरज निंबार्ते यांना क्रांतिकारी बिल्ला लावून संघटनेत सन्मानाने प्रवेश दिला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुरज निंबार्ते यांनी आजवर भंडारा जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने काम केले आहे. संकटकाळात बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची त्यांची आक्रमक वृत्ती यामुळे ते जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची व दांडग्या संघटन कौशल्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची मोठी धुरा सोपवली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आता अधिक प्रभावी वाचा फुटेल आणि शेतकरी चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुरज निंबार्ते यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थिती, पीकविमा, खतांची टंचाई आणि हमीभावाअभावी शेतकऱ्यांची होणारी बिकट स्थिती यावर परखड भाष्य केले. “भंडारा जिल्ह्यातील बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढण्यास मागेपुढे पाहणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दिला.
संघटनेकडून देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रामध्ये सुरज निंबार्ते यांच्या आगामी कार्यपद्धतीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत – संघटनेच्या ध्येय, धोरणे व उद्दिष्टांशी पूर्ण निष्ठा राखणे. – जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठी सातत्याने प्रत्यक्ष मैदानात कार्यरत राहणे. – संघटनेचे कार्यक्रम, आंदोलने आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय पुढाकार घेणे. – भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गाव-पाड्यापर्यंत संघटनेचा विस्तार करून संघटन अधिक मजबूत करणे.
सुरज निंबार्ते यांच्या निवडीबद्दल भंडारा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, आणि तरुणांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.





