हंसराज,भंडारा लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील विविध वाळू घाटांवर कंत्राटदारांकडून नियमांचे उल्लंघन करून अतीप्रमाणात वाळू उत्खनन व अवैध वाहतूक सुरू आहे. यावर तातडीने कारवाई करून हे अवैध कामे थांबवावी, अन्यथा शिवसेना (शिंदे गट) लाखांदूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
लाखांदूर तालुक्यातील खैरणा, खोलमारा, भागडी, दोनाड, मोहरणा १ व २, गवराळा १, २ व ३, टेंभरी, ईटान, दांडेगाव आणि धर्मापुरी या वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत. मात्र, संबंधित कंत्राटदार शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पटीने वाळूचे उत्खनन करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. हे उत्खनन करताना घाटाच्या सीमांकनाचे उल्लंघन केले जात असून, नदीपात्राचे मोठे नुकसान होत आहे.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, घाटांवर वाळूचा उपसा करण्यासाठी वापरले जाणारे अनेक ट्रॅक्टर अकृषक नसून ते कृषी कामाचे आहेत. नियमांची पायमल्ली करून ओव्हरलोड वाळूची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. या बेसुमार उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून भविष्यात नदीकाठच्या गावांना पूरस्थिती आणि पाणी पातळी कमी होणे यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख पदमाकर बावनकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक बाळाभाऊ शिवणकर, लाखनी तालुका प्रमुख उमेश गायधने, लाखांदूर तालुका प्रमुख गोवर्धन गाहाणे, साकोली तालुका प्रमुख राधेश्याम मुंगमोळे, लाखांदूर शहर प्रमुख श्रीकांत रनधिये, साकोली शहर प्रमुख नरेंद्र वाडीभस्मे, लाखांदूर युवा प्रमुख जितेंद्र ढोरे, लाखनी युवा प्रमुख अमन निर्वाण व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वाहतूक निरीक्षक, भंडारा यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

