spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महापौरांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी दिला पाठिंबा

– नवनियुक्त महापौरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी नव्या महापौरांचे अभिनंदन करत भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपूरच्या नियोजित व शाश्वत विकासासाठी राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा शब्दही दिला. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही भेट पार पडली. यावेळी नगरसेवक राहुल पावडे तसेच इतर उपस्थित होते.

भेटीदरम्यान महापौरांनी जीएसटी भरपाई रक्कम वाढविणे, पंधराव्या वित्त आयोगाचा प्रलंबित निधी वितरीत करणे तसेच पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून स्वहिस्सा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच महानगरपालिकेतील राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भरण्यात येणारी रिक्त पदे तातडीने भरणे आणि शहर विकासासाठी काही नझूल जमिनी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे, या मागण्यांसाठी निवेदन दिले.या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या दळणवळण मार्गाच्या मजबुतीकरणासाठी अंदाजे ८५ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मौजा पडोली ते देवाडा दरम्यानचा म्हाडा अतंर्गत मार्ग, जो राष्ट्रीय महामार्गस जोडतो, तो कोळसा आणि औद्योगिक साहित्य वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा पर्यायी मार्ग मानला जातो. चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या औद्योगिक शहरांदरम्यान तसेच तेलंगणा राज्याशी जोडणाऱ्या या मार्गावर सध्या जड वाहतुकीचा मोठा ताण असून रस्त्याची क्षमता अपुरी पडत असल्याने वारंवार अपघात, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण आणि बांधकाम होणे आवश्यक असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

चंद्रपूर हे विदर्भातील ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. श्री माता महाकाली मंदिर देवस्थान, विस्तीर्ण वनक्षेत्र आणि औद्योगिक वाणिज्यामुळे शहराची ओळख वेगळी आहे. सुमारे ५६.२८ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या महानगरपालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे गरजेचे असल्याचे मत महापौर यांनी व्यक्त केले.

या भेटीतून चंद्रपूरच्या विकासप्रवासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊन प्रलंबित प्रकल्पांना चालना मिळाल्यास नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यानी दाखवलेली सकारात्मकेबद्दल महापौर यांनी आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.