spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

असुरक्षित फवारणीचा जीवघेणा खेळ: पिकांवर कीटकनाशक मारताना बाळगा ही काळजी!

गडचिरोली :- सध्या शेतात पिकांवर कीटकनाशक फवारणीचा हंगाम वेगात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकरी उपाशीपोटी राहून, तंबाखू, धूम्रपान किंवा मद्यपान करून कीटकनाशकांची फवारणी करत असल्याचे समोर आले असून यामुळे थेट जिवाला धोका निर्माण झाला आहे.

पावसाने उसंत दिल्याने सध्या कापूस, सोयाबीन व इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. कीटकनाशक हे विषारी द्रव्य असल्याने फवारणी करताना योग्य खबरदारी न घेतल्यास फवारणी करणाऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. यापूर्वी विषबाधा होऊन अनेकांच्या जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सुरक्षित कपडे आणि उपकरणे: फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क आणि बूट किंवा गमबूट यांचा वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून कीटकनाशक अंगामध्ये किंवा त्वचेला लागणार नाही.

लेबलबद्दल माहिती: कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल आणि माहिती पत्रकावरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि दिलेल्या माहितीनुसारच फवारणी करावी. फवारणीनंतर साबनाने हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी टाळा: वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन फवारणी करावी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी केल्यास कीटकनाशके अंगावर उडण्याची शक्यता असते.

तंबाखूचे सेवन टाळा: फवारणी करताना तंबाखू किंवा धूम्रपान करू नये, कारण त्यामुळे कीटकनाशक पोटात जाण्याची शक्यता वाढते. तसेच मिश्रणात हात न घालता लाकडाच्या किंवा काठीचा वापर करावा.

पंपाट हवा फुंकू नका: फवारणी करताना नोजल बंद झाल्यास तोंडाने फुंकून किंवा ओढून ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये.

योग्य प्रमाणात फवारणी: कीटकनाशकांची शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त फवारणी करू नये, अन्यथा पिकांचे नुकसान व मानवी आरोग्याला हानी पोहोचू शकते.

तज्ञांचे आवाहन: कीटकनाशक हे अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे आणि त्याची पक्की पावती घ्यावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी, कडक उन्हात फवारणी टाळावी, असे कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी सुचवले आहे. विषबाधा झाल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Popular Articles